राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी हेरगिरी?

139

मुंबई: आपल्या निवासस्थानी पोलिसांनी हेरगिरी केल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्यपालांकडे थेट लेखी तक्रारच केली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत गृहखात्याविरुद्ध चौकशी करून कारवाईचे निर्देश द्यावेत अशी मागणीच विखे पाटील यांनी पत्राद्वारे राज्यपालांकडे केली आहे.

विखे पाटील यांच्या निवासस्थानी गेल्या गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे कर्मचारी अनधिकृतपणे माहिती घेत असल्याचे दिसून आल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. याबरोबरच, पोलिस कर्मचारी पत्रकारांची छायाचित्रेही काढली असल्याचे विखे पाटील यांचे म्हणणे आहे.

हा प्रकार अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारा असल्याचे विखे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या शासकीय निवासस्थानी विनाअनुमती प्रवेश करणे, पत्रकारांची छायाचित्रे काढणे, हा प्रकार अत्यंत संतापजनक, निषेधार्ह आणि घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मुलभूत हक्कांचा भंग आहे असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.