मुंबई: ‘चालतंय की’ म्हणत… राणा दा आणि पाठक बाईंची ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका घराघरांत पोहोचली. या मालिकेतील पात्रांइतकेच त्यांच्या तोंडी असलेले संवादही हिट ठरले. परंतु, सध्या अशाच काही संवादांमुळे मालिका अडचणीत आलीय. मालिकेत वारंवार उच्चारल्या जाणाऱ्या काही संवादांमुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन होतेय, असा आक्षेप घेत शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केलीय.

या मालिकेत खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नंदिता वहिनीच्या तोंडी शिक्षकांविषयी आक्षेपार्ह शब्द असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केलाय. मालिकेत शिक्षिकेच्या भूमिकेतील पाठक बाईंना सतत मास्तरीन, मास्तरडी म्हणणे असो किंवा इतर शिक्षकांचा उल्लेख मास्तुरड्या, दीमदमडीचे मास्तरडे असा झालेला असो; या सगळ्याच संवादांवर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केलीय. मालिकेतील पात्राच्या तोंडी असलेल्या अशा शब्दांमुळे शिक्षकांचा अवमान होत असल्याची भावना या संघटनांनी बोलून दाखवलीय.

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका महाराष्ट्रातील गाव-खेड्यांपासून शहरांपर्यंत पाहिली जाते. अनेकदा घरातील लहान मुलंदेखील हा कार्यक्रम पाहत असतात. मालिकेतील पात्राच्या तोंडी असलेल्या शिक्षकांबद्दलच्या या आक्षेपार्ह संवादांमुळे लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. ही मुलं टीव्हीवरील अनेक संवादांचं अनुकरण करत असतात. त्यामुळं काही शाळांमध्ये ही मुलं शिक्षकांना अशाच नावानं हाक मारतात. ही समस्या गंभीर असल्याचं शिक्षकांचं मत आहे. मुलांवर असे संस्कार होत राहिले तर भविष्यात ते शिक्षकांचा आदर करणार नाहीत, अशी भीतीही काही शिक्षकांनी व्यक्त केलीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here