प्रजासत्ताक दिनी दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून करुण अंत.
बारामती:- प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यामुळे पोहोण्यासाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बारामतीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीपासून जवळच असणाऱ्या पिंपळी इथं ही घटना घडली आहे. दगडखाणीत साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी दोन लहान मुलं गेली होती. सम्राट संतोष शिंदे वय 8 वर्षे आणि देवा तानाजेव शिंदे वय 9 वर्षे अशी या दोन मुलांचा नाव आहे.
प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यामुळे सम्राट आणि देवा दोघेजण गावाजवळच असलेल्या दगड खाणीत साठलेल्या पाण्यात पोहोण्यासाठी गेले होते. परंतु, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सायंकाळी साडेचार पाच वाजता आई-वडील मोलमजुरी करून आल्यानंतर आपल्या मुलांचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
तेव्हा घरापासून पाचशे मीटर अंतरावर असणाऱ्या दगड खाणीत या दोघांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. अवघ्या 8 आणि 9 वर्षांच्या चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.