
प्रज्वल मोरे: सातारचं माझं धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय. पदवीचं पाहिलं वर्ष. कॉलेजच्या लायब्ररीत जेव्हा मी अकाऊंट उघडलं, तेव्हा अभ्यासाची पुस्तके घेऊन वाचण्यापेक्षा मी इतर अवांतर वाचनच करायचो. पदवीच्या पहिल्या वर्षाला माझ्या हाती जे पहिलं पुस्तक पडलं त्या पुस्तकाचं नाव होतं ‘धागे उभे-आडवे’ आणि तेव्हा मला भेटले डॉ. अनिल अवचट सर. त्यांचा आयुष्य समृद्ध करणारा प्रवास आणि अनुभव मला त्या त्या प्रदेशात घेऊन गेला. अनिल अवचट हा आपलाच कोणीतरी दोस्त आहे आणि तो त्यांच्या त्या प्रवासातून आपल्याशी बोलत आहे, तिथलं चलतचित्र दाखवत आहे असं नेहमी वाटत राहायचं… सरांची पुस्तके मिळवून वाचण्याचा मी सपाटाच लावला होता. कॉलेजच्या लायब्ररीत एखादं पुस्तक नाहीच मिळालं, तर माझ्या दिमतीला सातारचं नगर वाचनालय होतंच त्यातून सरांची अनेक पुस्तके मी मिळवून वाचली होती. अनिल सरांचा बिहारचा प्रवास त्या ठिकाणी असलेलं दारिद्र्य, सरंजामशाही, अस्पृश्यता, जमीनदारी – ‘पूर्णिया’ मधून , तर कधी ‘वेध’, ‘छेद’ ही सामाजिक दंगलींवरची पुस्तके, कधी डोळ्याला न दिसणाऱ्या अंधश्रद्धा आणि उपेक्षित लोक त्यांच्या ‘धार्मिक’ आणि ‘संभ्रम’मधून भेटले, तर कधी 70 च्या दशकात आंबेडकरी समाजावर झालेले अनन्वित अत्याचार, ‘एक गाव एक पाणवठा’ची बाबा आढावांची चळवळ, नामांतर आंदोलन, ‘जय भीम’ नावासाठी कुर्बान झालेला शहीद पोचिराम कांबळे, ‘दलित पँथर’ आणि सर्व जातीय अत्याचार आणि त्यातूनही स्वाभिमानाने खंबीरपणे उभे राहणारे लोक आणि त्यांचा होणारा ‘कोंडमारा’ हे सगळं वाचताना डोळ्यातून आलेलं पाणी… ‘रिपोर्टिंगचे दिवस’ वाचताना पँथरफूट, इंदिरा गांधींची आणीबाणी समजून घेता आली.
सरांच्या ‘माणसं’, ‘वाघ्या-मुरळी’ या पुस्तकांतून समाजातला अस्वस्थ घटक मला सरांनी दाखवला, कधी ‘स्वतः विषयी’ मधून त्यांचे अंतरंग मला कळत होते. तर कधी त्यांचंच लिखाण वाचायचं म्हणून मी ‘साधनाचे’ जुने अंक ज्यात सरांचं लिखाण होतं ते मिळवून वाचायचो…
दूरदर्शन वरून विद्यार्थ्यांना शिकवलेल्या कागदी कला पाहत आम्ही मोठे झालो आणि मग कधी सरांचं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक संवेदनशील लेखक म्हणून, बुवाबाजी- अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्तीसाठी वाहून घेतलेल्या अवतारातलं दर्शन मला वेळोवेळी होत गेलं….
त्यांच्या समग्र प्रवासात मला कर्नाटक भागातील यल्लमाला सोडलेले जोगते- जोगतीनी, वेश्या, तंबाखू कामगार, हमाल तर कधी बिहारमधील पिचलेला माणूस अशा तळागाळांतील माणसांपासून ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते परिवर्तनाच्या आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीचे शिलेदार डॉ. बाबा आढाव तर कधी पँथर राजा ढाले, नामदेव ढसाळ ते पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पर्यंत सर्वजण मला भेटत गेले…
मी तेव्हा अर्धवट कॉलेज करून मिळेल ते काम करायचो. सरांना अनेक वेळा भेटण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि सातारच्या नगर वाचनालयात अनिल अवचट सरांचा कार्यक्रम कोणीतरी आयोजित केला होता. मी तेव्हा एके ठिकाणी कामाला होतो पण मला कामातून सुट्टीच दिली गेली नाही, तेव्हा वाईट वाटलं होतं…त्यानंतरही अनेकदा मी माझ्या पुण्यातील मित्रांकडे त्यांना भेटण्याबद्दल विचारायचो पण कधी भेटताच आलं नाही. सर मला अनेक पुस्तकांतून भेटले खरे पण सातारच्या त्या कार्यक्रमात सरांना भेटायचं राहूनच गेलं ही खंत कायम मनात राहील….
डॉ.अनिल अवचट सरांना विनम्र अभिवादन
– प्रज्वल मोरे, सातारा