बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतंर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम संपन्न

215

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतंर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम संपन्न

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतंर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम संपन्न

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची रायगड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. योजनेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त रविवारी (दि.२६) महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ बेटी पढाओ प्रतिज्ञा तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तसेच लेक लाडकी योजना लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

बेटी बचाव बेटी पढाओ अभियानाच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी ते ८ मार्च दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. योजनेअंतर्गत जनजागृती उपक्रमातून लिंगभेद चाचणी पद्धतीने प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलींचे संरक्षण आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रविवारी अलिबाग शहरातील पोलीस परेड मैदानावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्त्री भ्रूण हत्येचा आणि असे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करेन. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहीन. बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीते साठी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी शपथ दिली. यावेळी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तसेच लेक लाडकी योजनेअंतर्गत अन्वी नितिकेश पाटील व शिवन्या अविनाश पिंगळे यांना लाभाचे धनादेश वितरण करण्यात आले. कार्यक्रमास विविध वेशभूषा करून आलेल्या चिमुकल्या मुलींनी उपस्थितांची वाहवा मिळविली.

यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, महिला व बालविकास अधिकारी निर्मला कुचिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
…………………..