नूतन माध्यमिक विद्यालय खरवली येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

41

नूतन माध्यमिक विद्यालय खरवली येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने वातावरण भारावले!

✍️निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133📞

माणगांव :- मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती आपल्या संस्कृतीची ओळख, अस्मितेचा अभिमान आणि अभिव्यक्तीचे अनमोल लेणे आहे. या भाषेचा गोडवा अधिक वृद्धिंगत व्हावा, तिच्या समृद्ध परंपरेचा सन्मान व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या मनात मराठीची अस्मिता अधिक दृढ व्हावी, या हेतूने नूतन माध्यमिक विद्यालय, खरवली येथे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

हा दिवस मराठी भाषेचे श्रेष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांच्या शब्दांनी मराठी साहित्याच्या क्षितिजावर नवे दीप उजळले, मराठी भाषेला एक नवा आत्मविश्वास आणि व्यापकता दिली. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

शाळेतील वातावरण अगदी भारावून गेले होते. प्रत्येक कोपऱ्यात मराठी शब्दांची गोडी दरवळत होती, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात भाषेचा अभिमान जागत होता, आणि शिक्षकवृंदांनी दिलेल्या प्रेरणादायी विचारांतून मराठीचे महत्व अधिक गडद होत होते.

मराठी भाषेचे महत्व विध्यार्थ्यांना समजण्यासाठी विद्यालयात ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सन्माननीय गूळवणी सर होते. सूत्रसंचालन सौ. म्हात्रे मॅडम यांनी ओघवत्या शैलीत पार पाडले, तर कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. करकरे मॅडम यांनी प्रभावी शब्दांत सादर केली.

विद्यार्थ्यांनी या दिवसाचे औचित्य साधत नाट्यछटा, गाणी, भाषणे आणि कवितांच्या माध्यमातून मराठी भाषेचे सौंदर्य उलगडून दाखवले. काहींनी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण करून त्यांच्या साहित्याचे तेज साजरे केले, तर काहींनी मराठी भाषेवरील मनोगतांमधून भाषेच्या समृद्ध वारशाची जाणीव करून दिली.

विशेष आकर्षण ठरली इयत्ता ९वीच्या मुलींनी साकारलेली “चला मराठी रुजवू या, चला मराठी फुलवू या” ही देखणी रांगोळी. रंगांच्या मनोहारी संगतीतून त्यांनी मराठी भाषेच्या वाढीसाठी साकारलेल्या संदेशाने सर्वांचे मन जिंकले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मराठी भाषा जपण्याची, वृद्धिंगत करण्याची आणि तिच्या अस्मितेचे रक्षण करण्याची शपथ घेतली. संपूर्ण कार्यक्रमाची सांगता श्री. वडेकर सर यांच्या हृदयस्पर्शी आभार प्रदर्शनाने झाली, ज्यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले आणि मराठी भाषेच्या जतनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.

“शब्द माझे सोबती, शब्द माझे सर्वस्व!” या कुसुमाग्रजांच्या विचारांना साजेसा असा हा दिवस, शाळेच्या इतिहासात लक्षवेधी ठरला!