मुंबई: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाला जबाबदार असलेले संभाजी भिडे गुरुजी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फूस असल्यानेच त्यांना अटक होत नसल्याचा गंभीर आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करण्याचा अल्टिमेटमही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर आझाद मैदानावरील ‘एल्गार मोर्चा’ला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी हा आरोप केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरशी तुलना करत त्यांचा ऐकेरी उल्लेख केला. ‘हिटलर कुणाचंच ऐकत नव्हता. तो मनमानी करत होता. त्यामुळे शेवटी त्यालाही स्वत:ला गोळ्या घालून संपवावं लागलं. पंतप्रधान मोदी सुद्धा मनमानी करत आहेत. मंत्र्यांना कैद्यासारखी वागणूक देत आहेत. कैद्यासारखी वागणूक मिळत असल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अवघ्या दीड महिन्यातच मंत्रिमंडळातून बाहेर पडले,’ असं सांगतानाच ‘आम्ही तुमचे कैदी होणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.