शिक्षण, महिला व बालकल्याण समिती निवड: सभापतिपदी नेरलकर तर उपसभापतिपदी आयेशा बेगम
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
9420413391
नांदेड – वाघाळा महापालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीची औपचारिक घोषणा शुक्रवारी (ता. २५) विशेष सभेत करण्यात आली. यात सभापतीपदी कॉँग्रेसच्या अपर्णा नेरलकर तर उपसभापती म्हणून कॉँग्रेसच्याच आयशा बेगम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापालिकेतील पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, महिला व बालकल्याण समितीचा आगामी काळात केवळ सहा ते सात महिन्याचाच कालावधी शिल्लक राहिला आहे.
विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार सभापती व उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीसाठी ता. २२ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र वितरित करण्यात आले. ता. २३ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी वेळ देण्यात आली होती. तर निवडणुकीसाठी गुरूवारी (ता. २५) विशेष सभेत सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात घेण्याचे निश्चित झाले होते. बुधवारी दुपारपर्यंत सभापती, उपसभापतींची नावे निश्चित झालीच नव्हती. मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार अपर्णा नेरलकर यांनी सभापती तर उपसभापतीपदासाठी आयेशा बेगम बाबूभाई खोकेवाले यांचे अर्ज पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्याकडे दाखल केले होते. यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित झाली होती. केवळ औपचारिक घोषणा शिल्लक राहिली होती.