जनतेने मतरुपी आशीर्वाद देत वंचित बहुजन आघाडीचा रथ विजयाकडे न्यावा – राजेश बेले
• वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर/यवतमाळ : 27 मार्च
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांनी बुधवार, 27 मार्च रोजी आपला नामांकन अर्ज दाखल केला.
सकाळी साडेदहा वाजता संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन करून, माता महाकालीच्या चरणी नतमस्तक होऊन,पटेल हायस्कूल जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य अशा रॅलीच्या द्वारे गांधी चौकातून आंबेडकर चौक ते जटपुरा गेट येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली द्वारे राजेश बेले यांनी जिल्हाधिकारी कार्यलयात आपला नामांकन अर्ज दाखल केला.या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे वरिष्ठ नेते, ओबीसी समाजाचे नेते तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्यात वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडी यांच्यातील चर्चित जागावाटप फार्मूला फसल्याचे चित्र पुढे आले आहे. चंद्रपुरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांना एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. तेली समाजातील महत्त्वाचे नेते असलेल्या राजेश बेले यांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. जनतेने मतरुपी आशीर्वाद देत वंचित बहुजन आघाडीचा रथ विजयाकडे न्यावा असे आवाहन बेले यांनी यावेळी केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारांची अधिकृत घोषणा केल्याने मविआ सोबत जाण्याची चिन्हे मावळली आहेत.