लढा कोरोनाशी: नागपुरातील नागरिकांसाठी भाजपाचा नियंत्रण आणि सहाय्यता कक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले उदघाटन
‘सेवांकूर‘चा सहभाग, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची कार्यालये राहणार संलग्न; डॉक्टर्स, रुग्णसेवा, समुपदेशन, प्लास्मा डोनेशन, लसीकरणासाठी करणार सहाय्य
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला सारेच तोंड देत असताना नागपुरातील नागरिकांसाठी आणि रुग्णांसाठी एक नियंत्रण आणि सहाय्यता कक्षाचे आज सकाळी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केले.
रा. स्व. संघाच्या विचारांनी प्रेरित सेवांकुर या संस्थेने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कार्यालये सुद्धा या नियंत्रण कक्षाशी जोडलेली असणार आहेत. त्यामुळे संपूर्ण मदत कार्याचे अतिशय प्रभावीपणे संयोजन या एकाच ठिकाणाहून शक्य होणार आहे. भाजपा वैद्यकीय आघाडी सुद्धा या उपक्रमात सहभागी आहे. सर्व क्षेत्रातील लोक या रचनेत काम करणार असून, डॉक्टर्स, वैद्यकीय विद्यार्थी, आयटी आणि स्वयंसेवक-कार्यकर्ते यात योगदान देतील. आपत्कालीन सेवेसाठी दोन रुग्णवाहिका येथे तैनात असतील.
गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहाय्य करणे, त्यासाठी रुग्णवाहिका, इतरही सहाय्य पुरवणे आदी समन्वय या माध्यमातून होईल. या कक्षामार्फत समुपदेशनाची सुद्धा सेवा देण्यात येणार आहे. प्लास्मा डोनेशन आणि लसीकरण यासाठी सुद्धा हा कक्ष काम करेल. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात गरजूंना दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरातील गरजू नागरिक या नियंत्रण कक्षाशी 08929908958 या हेल्पलाईन क्रमांकावर क्रमांकावर संपर्क करू शकतात.
यावेळी आमदार प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, माजी महापौर संदीप जोशी, किशोर वानखेडे, मुन्ना यादव, सेवांकूरचे डॉ. सचिन जांभोरकर, डॉ. धीरज गुप्ता, पराग सराफ, डॉ. चरडे, कुमार मसराम, कनैय्या कटारे, प्रशांत दाणी आणि इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते.
लसीकरण केंद्रांना भेटी!
देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील नरेंद्र नगर, मनिष नगर येथील लसीकरण केंद्रांना सकाळी भेटी दिल्या. भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.