वाघांची वाढत असलेली संख्या व माणसाचे संघर्षमय जीवन. ..!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५  

एका काळात असं होतं की, वाघाचे नाव जरी कानी पडल्यावर किंवा कोणी वाघाला जवळून बघितलेली कहाणी सांगितल्यावर ती कहाणी ऐकताच अंगावर काटे यायचे हे वास्तव सत्य आहे. पण, आजकाल बघितले तर..दररोज वाघाने शिकार केलेल्या बातम्या वृतपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळत असतात. वाघाने माणसाचा बळी घेतला या घटनेत आपण कोणाला दोष द्यावे माणसाला. .? वाघाला. .? की,शासनाला..? हेच कळत नाही. वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे यात काही शंका नाही व वाईट सुध्दा नाही पण,त्याच वाघांमुळे माणसांच्या जीवनात जर.. संकटे निर्माण होत असतील तर मात्र चिंतेचा विषय आहे.

आठवड्यातून माणसाचा किंवा मुक्या प्राण्यांचा वाघाने बळी घेतला अशा बातम्या नेहमीच वाचायला मिळत असतात. एवढेच नाही तर, आजकाल वाघांनी आपला मोर्चा गावखेड्याकडे वळवला आहे हे कोणापासूनही लपलेले नाही. वाघ जरी जंगलाचा राजा असला तरी गावखेड्यात राहणारे लोक त्याची प्रजा नाही पण, हे घोर कलियुग म्हणावे की, काय असे अनेक जणांच्या मुखातून निघालेले शब्द ऐकायला मिळत असतात. गेल्या चार, पाच वर्षांपूर्वी गावखेड्यात राहणारे लोक उन्हाळ्यात आपल्या अंगणात खाट टाकून निवांत झोपायचे असा एकही घर दिसत नव्हत, कोणाच्या अंगणात खाट दिसत नव्हती पण, आजच्या व आताच्या घडीला बघितले तर, गावखेड्यात राहणाऱ्या लोकांच्या मनात वाघांविषयी खूप भीती निर्माण झालेली दिसून येत आहे. एवढेच नाही तर…रात्रीची झोप ते नीट घेऊ शकत नाही. यांचे महत्वाचे दुसरे कारण म्हणजेच गावखेड्यात पूर्णपणे वीजपुरवठा मिळत नाही त्यामुळे अतिशय गरम वातावरण असताना सुध्दा ते घरात झोपत असतात. 

      त्यात सर्वात जास्त दु:खाची गोष्ट म्हणजेच त्यांच्या घरी लहान मुले असतात त्यांचीही झोप नीट होत नाही वीज अचानक निघून गेली की,त्यांचे रडणे सुरु होते व ज्या महिलेचे बाळंतपण झाले असते त्या महिलेला व घरच्या लोकांना नवजात बाळाला होणारा गरमीपासून त्रास सहन करावा लागतो अशी अतिशय भयंकर परिस्थिती आज गावखेड्यात निर्माण झालेली आहे. त्यामध्येच वाघाची भीती मग गावखेड्यात राहणारे लोक जगणार तरी कसे…?

एवढेच नाही तर..वाघ गाईच्या गोठ्यात घुसून गाई, वासरांचा बळी घेत आहे. अशा वेळी, त्या मुक्या प्राण्यांनी कोणाला हाक मारावे…?  त्यांची हाक कोणी ऐकून घ्यावी?एवढी भयंकर परिस्थिती आज निर्माण होताना दिसत आहे जिकडे, तिकडे वाघांविषयी चर्चा ऐकायला मिळत असतात खरच अशा प्रकारच्या बातम्या व चर्चा ऐकून माणसाने कशाप्रकारचे जीवन जगावे हि विचार करायला लावणारी बाब आहे. 

       एका महिन्यातून मुक्या प्राण्यांचा तसेच माणसांचा बळी वाघाने घेतला ऐकायला, वाचायला मिळत असतात. त्याच प्रमाणे तीसरी गोष्ट ती म्हणजेच या गेल्या दोन वर्षापूर्वी गावखेड्यातील लोक जंगलातील मोहफुले वेचण्यासाठी बहुसंख्येने जात असायचे व मोहफुले तीन, चार पोते वेचून चांगल्याप्रकारे साठवून ठेवायचे चांगला भाव आला की, विकून उदरनिर्वाह करत असायचे या वर्षी तर..अंगणात वाळू घातलेले मोहफुले फार कमी प्रमाणात बघायला मिळत आहेत हे,फक्त वाघांच्या दहशतीमुळे व भीती मुळे हे वास्तव सत्य आहे.

वाघांची संख्या वाढत असताना पाहून लोकांमध्ये एक प्रकारची चिंता निर्माण झालेली आहे त्यामुळे काही लोक जंगलाला लागून असलेल्या शेतात सुद्धा जात नाही. कारण, शेतातील पीक बघायला गेले तर..घरी जिवंत येतील याची गॅरंटी नसते आज ह्या, वाघांच्या दराऱ्यामुळे माणसाचे चाललेले संघर्षमय जीवन कधी संपणार किंवा नाही हेच अनेकांना पडलेला भारी प्रश्न आहे. म्हणून शासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे वाघांची हि दखल घ्यावी तेवढेच लक्ष माणसांकडे द्यावे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here