संतुलित संघ निवड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( WTC), भारताचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपणार…

85

संतुलित संघ निवड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( WTC), भारताचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपणार…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

अर्थात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची निवड करण्यात आली. ६ जून पासून या अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशात रंगणार आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने याआधीच आपला संघ निवडला आहे. आता भारतानेही या सामन्यासाठी आपला १५ सदस्यांचा संघ घोषित केल्याने या अंतिम सामन्याची उत्सुकता वाढली आहे.

भारताने निवडलेल्या १५ खेळाडूंपैकी कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, के एल राहुल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के एस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल या बारा खेळाडूंची निवड पक्की होती कारण त्यांनी गेल्या वर्षात अप्रतिम कामगिरी बजावली होती. उर्वरित तीन जागांसाठी जयदेव उनाडकट, शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य रहाणे यांची निवड करून निवड समितीने संतुलित संघ निवड करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेले वर्षभर कसोटीत पाचव्या क्रमांकासाठी निवड समितीने अनेक प्रयोग केले. हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना निवड समितीने या क्रमांकावर संधी दिली. श्रेयस अय्यर याने या क्रमांकावर बऱ्यापैकी धावा काढल्या होत्या मात्र गेल्या काही दिवसांपासून तो दुखापतीने त्रस्त आहे त्यामुळे या जागेवर कोणाची निवड होणर याची उत्सुकता होती. निवड समितीने अखेर अजिंक्य रहाणे याला संधी देऊन ही उत्सुकता संपवली. अजिंक्य राहणेची निवड अपेक्षितच होती कारण गेल्या काही दिवसांपासून रहाणे आपल्या पूर्वीच्या फॉर्ममध्ये परतला आहे. सध्या तर तो तुफान फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघासाठी तो खोऱ्याने धावा काढत आहे. एका बदलेल्या अवतारात अजिंक्य रहाणे आता दिसत आहे. केवळ आयपीएलच नाही तर रणजी करंडक स्पर्धेतही त्याने धावा काढल्या आहेत शिवाय इंग्लंडच्या लॉर्ड्सवर खेळण्याचा त्याला अनुभव आहे. इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळुनच त्याने आपला फॉर्म परत मिळवला आहे. त्यामुळे त्याची निवड अपेक्षितच होती. निवड समितीने अजिंक्य रहाणेला संधी देऊन भारताची फलंदाजी बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची निवड स्वागतार्ह आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा आपल्याला अंतिम सामन्यात नक्की होणार आहे.

निवड समितीने या अंतिम सामन्यासाठी रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे हे पाच निव्वळ फलंदाज निवडले आहेत हे पाचही फलंदाज अंतिम सामन्यात खेळणार आहे. के एस भरत आणि के एल भरत हे दोन यष्टीरक्षक संघात आहे या दोघांपैकी एकाची अंतिम सामन्यात निवड होईल. के एल राहुल फलंदाज म्हणून चांगला आहे तर के एस भरत यष्टीरक्षक म्हणून चांगला आहे त्यामुळे या दोघांपैकी कोणाची निवड करायची याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेईल मात्र के एल राहुलचे पारडे या क्षणी तरी जड दिसतेय कारण त्याने या आधी लॉर्ड्सवर धावा काढल्या आहेत.

मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट या चार वेगवान गोलंदाजांपैकी शमी आणि सिराज यांची निवड पक्की आहे. रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर हे चार अष्टपैलू खेळाडू संघात आहेत या चौघांपैकी तिघे जण अंतिम सामन्यात खेळतील. म्हणजेच संघात पाच फलंदाज, यष्टीरक्षक, दोन वेगवान गोलंदाज व तीन अष्टपैलू खेळाडू असतील. अर्थात अश्विन, जडेजा, अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाज असले तरी गेल्या काही वर्षात त्यांनी फलंदाजीतही चुणूक दाखवली आहे त्यामुळेच ते आता अष्टपैलू म्हणून ओळ्खले जातात याचाच अर्थ आपल्या संघात अष्टपैलूंचा भरणा आहे आणि हेच अष्टपैलू खेळाडू अंतिम सामन्यात एक्स फॅक्टर ठरू शकतात.

निवड समितीने निवडलेले सर्व पंधराच्या पंधरा खेळाडू अनुभवी आहेत. भरत आणि अक्षर पटेल वगळता सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे त्यामुळे भारत या अंतिम सामन्यात हॉट फेव्हरेट आहे. अर्थात ऑस्ट्रेलिया देखील पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याने हा सामना रंगतदार ठरणार यात शंका नाही. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांनी वर्षभर चांगली कामगीरी करून अंतिम सामन्यात पोहचले आहेत. भारत तर मागील वर्षीही अंतिम सामन्यात पोहचला होता मात्र न्यूझीलंड कडून त्यावेळी भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात झालेल्या चुका भारताने टाळल्या आणि सर्व खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार खेळ केला तर आपला संघ कसोटीत अजिंक्य ठरू शकतो. भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा..