मौजा मांडेसर येथे शाळेतील पहिले पाऊल व शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न !
मांडेसर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत अभिनव उपक्रम !
मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज – भवन लिल्हारे ( अध्यक्ष शा.व्य. समिती मांडेसर )
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे स्टार्स उपक्रम सन २०२४-२०२५ बालविकास विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्रथम संस्था यांचे संयुक्त सहभागातून शाळा पूर्वतयारी अभियान अंतर्गत शाळेतील ” पहिले पाऊल ” हा कार्यक्रम राज्यभर राबविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील नेरी केंन्द्रा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांडेसर , येथे शाळा पूर्वतयारी मेळावा, व अभिनव उपक्रम शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष मा. भवन लिल्हारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २३ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी मुख्याध्यापक मा.डी.के. माटे सर , मा. वनवास धनिस्कार सर, मा. शैलेन्द्र गजभिये सर, मा.राजू बालपांडे सर, मा. विठ्ठल माटे सर, मा. नरेंन्द्र निंबार्ते सर, स्वयंपाकी सौ. राधिका लिल्हारे , सौ.कलाबाई लिल्हारे , अंगणवाडी सेविका बोरकर मॅडम , दमाहे मॅडम , मा. महेन्द्र सव्वालाखे, मा. राजकुमार चन्ने, क्रिष्णा चोपकर, मा. नरेन्द्र लिल्हारे, श्याम चन्ने, माता पालक, केंद्रातील केंद्रप्रमुख मा. नरेन्द्र उरकुडे सर , मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनिस , माता लिडर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यशाळेत नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शाळा पूर्व तयारी मेळावा उद्देश, प्रभावी अंमलबजावणी, निपुण भारत, अध्ययन निष्पत्ती या विषयी मुख्याध्यापक मा. डी.के. माटे सर यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन केले.
सहाय्यक शिक्षक शैलेंद्र गजभिये यांनी मार्गदर्शन करतांना मागील वर्षाची शाळा पूर्वतयारी मेळावा, शालेय स्तरावर केलेली अंमलबजावणी व येत असलेल्या समस्या या विषयी अनुभव कथन केले. तर सहाय्यक शिक्षक राजू बालपांडे सर यांनी कार्यशाळेसाठी असलेले सुभलक नोंदनी कक्ष, शारीरि विकास, बौद्धिक विकास , भाषा विकास, सामाजिक व भावनीक विकास , गगन पूर्वतयारी पालकांना शाळा पूर्वतयारी साहित्य वाटप, शाळेतील पहिले पाऊल पुस्तिका , विकास कार्ड यांची ओळख करून दिली.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांडेसर येथे प्रवेशोत्सवात इयत्ता १ लीत दाखल होणार्या विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षकांनी व ८ वीच्या विद्यार्थिनीनी औक्षण करून शाळेत स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक मा. डी. के. माटे आणि दाखल होणार्या विद्यार्थ्यांचे हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. इयत्ता १ लीत प्रवेशपात्र असलेल्या गावातील एकूण १५ विद्यार्थ्यांचे औक्षण करून सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेतील ७ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी फुग्यांनी शाळेची सुंदर सजावट केली, रांगोळी काढली तसेच दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट तयार केला. दाखल पात्र विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेतले. नंतर विद्यार्थ्यांच्या पूर्व ज्ञानावर आधारीत शारीरिक, बौद्विक, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्वक तयारी या क्षमतांची चाचणी घेण्यात आली. यासाठी शाळा स्तरावर एकूण सात स्टॉल तयार करण्यात आले होते. या प्रसंगी प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची बडबडगीते व नृत्य, खेळ घेण्यात आले. अत्यंत आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेऊन पुढील दीड महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घ्यायची, याबाबत पालकांशी चर्चा करण्यात आली.
या प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. भवन लिल्हारे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना *मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज* आहे.
शिक्षणाची भाषा कोणती असावी, यावर आपल्याकडे गेली अनेक वर्ष विचारमंथन सुरू आहे. केवळ समाजातच नव्हे तर घराघरांत यावर चर्चा सुरू आहे. चर्चा कसली वाद विवादच म्हणा कारण आईवडील, नातेवाईक, शेजारीपाजारी या सर्वांमध्ये याबाबत मतभिन्नता आढळते. शिक्षणासाठी कोणते माध्यम वापरावे याबाबत तर्कशास्त्र वापरले जात नसल्याने मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयांचा गोंधळ उडतो. विशेषतः इंग्रजी माध्यमांच्या शाळा जशा वाढू लागल्या तसा हा गोंधळ जास्त होऊ लागला. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या झगमगाटाला भुलून सर्वसामान्य माणूसही आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करू लागला. पूर्वी शहरी भागापूरते असणारे हे लोण आता ग्रामीण भागातही पसरले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब, कष्टकरी पालक कर्ज काढून उधार उसनवारी करून लाखो रुपयांच्या देणग्या भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करीत आहेत.
मुळात इंग्रजी शिकणे आणि इंग्रजी माध्यम शिक्षण म्हणून निवडणे यात पालकांची गल्लत होते. इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी माध्यम निवडणे खरेच गरजेचे आहे का? इंग्रजी शिकण्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीतून घेणे योग्य आहे का? याचा विचार पालक करत नाहीत. मातृभाषेतून शिक्षण घेऊनही चांगले इंग्रजी शिकता येते हेच पालक विसरत चालले आहे. मातृभाषेतून शिक्षण शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा आहे. ती भाषा मुलाला तो आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मुलाची मानसिक वाढ परिपूर्ण होते कारण ते मूल ज्या वातावरणाचा भाग आहे त्या वातावरणाचे प्रतिबिंब त्याला मातृभाषेत दिसते. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हीच शिकण्याची आदर्श पद्धत आहे. सांस्कृतिक, सामाजिक मूल्यांची रुजवन फक्त मातृभाषेतूनच होऊ शकते.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात माय, माती, मातृभाषा आणि मातृभूमी यांचे अनन्यसाधारण महत्व असते. माय जन्म देते, माती भरण पोषण करते, मातृभूमी आसरा सुरक्षा देते आणि मातृभाषा योग्य संस्कार करते. या संस्काराच्या शिदोरीवरच प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुखी व समृद्ध होते. म्हणून किमान प्राथमिक आणि माध्यमिक स्तरांवर तरी शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषा असली पाहिजे. असे अनेक भाषातज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ तसेच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील संस्था ओरडून सांगत आहेत. सुरवातीला एकदा मातृभाषेतून मूलभूत शिक्षण घेतल्यावर नंतर इंग्रजी अथवा इतर परकीय भाषा गरजेनुसार आत्मसात करणे, त्यांचा काळ परिस्थितीनुसार वापर करणे यास कोणाचीही काहीही हरकत असण्याचे कारण नाही.
शिक्षण प्रणालीतून असे शिक्षण दिले पाहिजे की , शिक्षण घेऊन बाहेर पडेल त्याला तो राहत असलेल्या प्रदेशातील पर्यावरणाची जाणीव असेल, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय जबाबदारीचे त्याला भान असेल, देशाला भेडसावणाऱ्या समस्या व आव्हाने ओळखून त्याचा सामना करण्यास तो समर्थ असेल. युनेस्को ही युनोची शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी उपसंस्था आहे. युनेस्कोने केलेल्या संशोधनातून मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकलनशक्ती व गुणवत्ता ही मातृभाषेतर माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी चांगली व सरस असते असे आढळून आले आहे.
महात्मा गांधी म्हणतात मातृभाषा शिक्षणाचे योग्य माध्यम आहे. मातृभाषेतूनच मुलांचा भावनिक आणि सामाजिक विकास होऊ शकतो. सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांची पेरणी फक्त मातृभाषेतूनच होऊ शकते. जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर म्हणतात, मातृभाषाच मुलांच्या स्वाभाविक शिक्षणाचे माध्यम असून त्याच भाषेतून त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.
इंग्रजी माध्यमाचा विचार केला तर इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलेल्या मुलांना सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध होईल असे पालकांना वाटते म्हणून पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालत असतील असे जरी मान्य केले. तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून शिकलेले सर्वच मुले यशस्वी होतात असेही नाही. उलट आज जे उच्चपदावर पोहचलेले मान्यवर आहेत मग ते डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यिक असोत की शास्त्रज्ञ, उद्योजक, नेते, अभिनेते सर्वच मराठी भाषेतून शिकलेले आहेत. आयएएस,आयपीएस, आयएफएस यांची जर यादी पाहिली तर त्यातील ९५ टक्के अधिकाऱ्यांचे शिक्षण मातृभाषेतूनच झाले आहे. मागील काही वर्षात स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीच आहे.
इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, चीन, जपान, रशिया यासारख्या प्रगत देशातही मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. या देशातील पालक जाणीवपूर्वक आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण देतात. फिनलँड सारखा देश की ज्या देशाच्या शिक्षण पद्धतीचे अनुकरण प्रगत राष्ट्रही करतात. त्या देशातही मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर मुलांना इंग्रजीचे डोस पाजले तर इथला मराठी भाषेचा समृद्ध ठेवा लुप्त होईल. मुलांमध्ये, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मता, चांगल्या संस्काराचे रोपणकरायला मातृभाषाच कामी येईल.
शिक्षणात मातृभाषेमुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. मातृभाषा ही संस्काराचा आणि संस्कृतीचा मानबिंदू आहे. जितक्या सहजतेने मूल मातृभाषेतून शिकते तितक्या सहजतेने इंग्रजीतून शिकत नाही. म्हणून मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण आहे. असे मार्गदर्शन मा. भवन लिल्हारे (अध्यक्ष शाळा व्य. समिती ) यांनी केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामस्थ व पालक वर्ग ,विद्यार्थी,विद्यार्थिनी,सहायक शिक्षक , अंगणवाडी सेविका, मोठया संख्येने उपस्थित होते.