चोरट्यांची नजर आता औषध दुकानांवर; वर्ध्यात दोन औषध दुकाने फोडली.

✒आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
वर्धा, दि.27 मे :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, एकाच रात्री दोन औषधी दुकाने आणि कृषी केंद्रात चोरी करून रोख लंपास केल्याने संचारबंदीतही चोरटे सुसाट झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेने शहरातील व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वंजारी चौक स्थित बॅचलर रोडवर अतुल दादाराव भरणे यांचे औषध दुकान आहे. रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. तसेच गल्ल्यातील 5000 रुपये दिसून आले नाहीत. इतकेच नव्हेतर, दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड करून त्यातील 8 हजार किमतीची हार्डडीस्क चोरून नेली.
दुसरी चाेरीची घटना मालगुजारीपुरा परिसरात घडली. मालगुजारीपुरा परिसरात आशिष घनश्याम मनोजा (रा. दयालनगर) यांचे औषधी दुकान आहे. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातील सहा हजार रुपये चोरून नेले. तिसरी चोरीची घटना सिंदी लाइन मोहता मार्केट परिसरात घडली. श्यामसुंदर किसनलाल चांडक आणि भागीरथ चांडक यांच्या मालकीच्या कृषी केंद्रात चोरट्याने चोरी केली. श्यामसुंदर यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील 1400 रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रं तसेच भागीरथ चांडक यांच्या दुकानात चोरी करीत गल्ल्यातून 2500 रुपये चोरून नेले. या तिन्ही घटनांची तक्रार शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात सर्व दुकाने बंद असतानाही चोरटे मात्र सुसाट झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात संचारबंदी असतानाही होणाऱ्या चोऱ्या ही चिंतेची बाब बनली आहे. या घटनांमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी दिवसापेक्षा रात्रीची गस्त वाढवावी, जेणेकरून चोरट्यांना अटकाव होईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.