पुरस्कारांची घोषणा झाली: वाटप कधी करणार राज्य सरकारकडून पुरस्कारांची फक्त घोषणा

पुरस्कारांची घोषणा झाली: वाटप कधी करणार

राज्य सरकारकडून पुरस्कारांची फक्त घोषणा

पुरस्कारांची घोषणा झाली: वाटप कधी करणार राज्य सरकारकडून पुरस्कारांची फक्त घोषणा

रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३

अलिबाग:शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करुन अन्य शेतकर्‍यांना आदर्श ठरत असलेल्या शेतकर्‍यांचा राज्य कृषी विभागाच्यावतीने विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत असतो. दरवर्षी जिल्हा कृषी विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर या पुरस्कारांचे वाटप केले जात होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांची फक्त घोषणा झाली आहे. प्रत्यक्षात वाटप अद्याप झालेले नाही. त्यामुळे कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यास मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना वेळच मिळत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून महाराष्ट्र राज्य सरकार मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या दिवसाचे औचित्य साधून भाजीपाला-फलोत्पादन आणि भातशेतीत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राज्यातील शेतकर्‍यांना राज्य सरकार विविध प्रकारचे कृषीभूषण तसेच वसंतराव नाईक यांच्या नावे कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरव करीत असते. मात्र, राज्य सरकारकडून राज्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या शेतकर्‍यांना जाहीर करण्यात आलेल्या कृषी पुरस्काराचे वितरण करण्यास वेळच मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे भात शेतीचे क्षेत्र कमी झाले असले, तरीही जिल्ह्यातील लाखो शेतकरी शेतीतून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये सध्या 98 हजार हेक्टर इतके भाताचे क्षेत्र आहे. दोन लाखाहून अधिक शेतकरी जिल्ह्यामध्ये आहेत. यातील काही शेतकरी आधुनिकतेवर भर देत शेतीच्या उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. भातशेतीबरोबरच भाजीपाला, फलोत्पादन वाढीवरही शेतकरी लक्ष देत आहेत. यामध्ये तरुण शेतकर्‍यांचाही सहभाग वाढत असल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक प्रख्यात कृषी तज्ज्ञ व प्रगतशील शेतकरी होते. मुख्यमंत्री असताना कृषी विभागासाठी त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यामुळे त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांची आठवण प्रत्येक शेतकर्‍यांना स्मरणार्थ राहवी यासाठी राज्य सरकारकडून शेतीमध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या शेतकर्‍यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कारासह शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी असे विविध पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार कृषी, कृषी संलग्न क्षेत्र, फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या शेतकर्‍यांना पुरस्कार देण्यासाठी 2020 पासून ते 2022 पर्यंत त्यांची यादी तयार करण्यात आली. 23 फेब्रुवारी 2004 रोजी परिपत्रक काढून पुरस्कार देण्याची मान्यतादेखील देण्यात आली. पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांकडे सोपविण्यात आली.

रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील डॉ. मकरंद आठवले यांना वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, पाली- सुधागडमधील रसिका फाटक यांना युवा शेतकरी पुरस्कार, रोहामधील धनंजय जोशी यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, उरणमधील प्रकाश ठाकूर याना वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, रोहामधील संतोष दिवकर यांना कृषी भूषण सेंद्रीय शेती पुरस्कार, पनवेलमधील सज्जन पवार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, पेणमधील धाया भला यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, रोहामधील प्राची शेपुंडे यांना जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, तसेच रोहामधील अनंत भोईर यांना कृषी भूषण सेंद्रीय शेती पुरस्कार आणि उरणमधील प्रफुल्ल खारपाटील यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर केले आहेत. मात्र शेतकरी आजही पुरस्काराच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले. या शेतकर्‍यांना पुरस्काराची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

रायगडातील दहा शेतकरी

रायगड जिल्ह्यातील दहा शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कारसह विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्याचे परिपत्रकही गेल्या चार महिन्यांपूर्वी काढण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांना पुरस्कार वितरीत करण्यात आला नाही. सरकारकडून पुरस्काराची घोषणा फक्त वार्‍यावर असल्याचे चित्र दिसून आले असून, जिल्ह्यातील बळीराजाला या पुरस्काराची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
कृषी अधिकारी व्यस्त
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाणखेळे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी वंदना शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना अद्याप पुरस्कार न मिळाल्याबाबत शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.असता संपर्क होऊ शकला नाही.

कृषी पुरस्काराचे वितरण करण्यास वेळच मिळत नसल्याने राज्यातील शेतकर्‍यांमध्ये सरकारविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तरी, 1 जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आलेल्या पुरस्काराचे वितरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here