जिल्ह्यातील या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने पक्षातून केले निलंबित डॉ. विजय व डॉ. आसावरी देवतळे यांचे निलंबन

जिल्ह्यातील या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने पक्षातून केले निलंबित

डॉ. विजय व डॉ. आसावरी देवतळे यांचे निलंबन

जिल्ह्यातील या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने पक्षातून केले निलंबित डॉ. विजय व डॉ. आसावरी देवतळे यांचे निलंबन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

वरोडा : 27 जून
राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री स्व. दादासाहेब देवतळे यांचे पूत्र आणि काँग्रेसचे कार्यकर्ते डॉ. विजय देवतळे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. आसावरी देवतळे यांना गुरुवारी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. हे दोघेही विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांचे समर्थक होते. त्यांचे निलंबन वडेट्टीवार समर्थकांना मोठा धक्का समजल्या जात आहे.
स्व. दादासाहेब देवतळे यांच्यानंतर संजय देवतळे यांनी वरोडा-भद्रावती क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाला बळकटी दिली, पक्षाचा विस्तार केला आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2014 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्यावरून संजय देवतळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते निवडणूक हरले. त्याचवेळेस काँग्रेसने डॉ. आसावरी देवतळे यांना तिकीट दिले होते आणि त्यांनी 36 हजाराच्यावर मते घेतली होती. त्यानंतर डॉ. आसावरी या काँग्रेसच्या प्रदेश सचिवसुद्धा झाल्या.
2019 मध्ये स्व. बाळू धानोरकर यांनी प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर धानोरकर दाम्पत्य खासदार व आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासूनच डॉ. विजय देवतळे व धानोरकर कुटुंबियांत काही ‘आलबेल’ नव्हते. डॉ. देवतळे हे सातत्याने काँग्रेसच्या मंचावरून दिसेनासे झाले. हा संघर्ष पुढे 2023 च्या वरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चव्हाट्यावर आला. यावेळेस डॉ. विजय देवतळे आणि बाळू धानोरकर हे थेट एकमेकांविरोधात लढले आणि डॉ. देवतळे हे सभापती झाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्येसुद्धा देवतळे कुटुंब कुठेही काँग्रेसच्या मंचावर दिसले नाही.
गुरुवारला काँग्रेसचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी पाठविलेल्या पत्रात पक्षविरोधी काम केल्याबाबत डॉ. देवतळे दाम्पत्याविरूद्ध स्थानिक पातळीवरून अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयास प्राप्त झाल्याचे सांगत, त्यांना सहा वर्षाकरिता काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात येत आहे, असे पत्रात नमूद केले आहे.
======
पक्षविरोधी काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : डॉ. देवतळे
आम्ही सातत्याने काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत. त्यामुळे पक्षविरोधी काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निलंबन करण्यापूर्वी पक्षाने कुठलीही नोटीस दिली नाही किंवा स्पष्टीकरण मागितले नाही. पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे पक्षाने आम्हाला द्यावे. याउलट विद्यमान खासदार शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्याने त्यांना जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांची गरज राहिली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून आम्ही दावेदारी करू नये म्हणून दबावाखाली ही कारवाई केल्याचे डॉ. विजय देवतळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here