नदी काठी पुरसंरक्षण भिंत बांधून कायमस्वरूपी उपाययोजना करा – आ. किशोर जोरगेवार
अश्विन गोडबोले
चंद्रपूर ब्युरो चीफ
📱 8830857351
चंद्रपूर, 27 जुलै:अल्पशा पावसाने चंद्रपूरात वारंवार पुरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या भागात जिवीतहाणी होण्याची शक्यताही बढावली आहे. त्यामुळे आता याचे योग्य नियोजन करुन भविष्यात उद्भवणा-या पूरपरिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करत येथील नदीकाठच्या संपूर्ण भागात पूर संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे
मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आ. जोरगेवार यांनी चंद्रपूरातील पूरपरिस्थितीचा प्रश्न लावून धरला आहे. आज अधिवेशनाच्या नवव्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी पून्हा एकदा हा विषय मांडत वारंवार उद्भविणा-या पूरपरिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, चंद्रपूर शहराच्या पश्चिमेला वाहणाऱ्या इरई नदीकाठा जवळील परिसरातील सिस्टर कॉलनी, रेहमतनगर या भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पावसाळयात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी या सखोल नागरी भागात शिरत आहे. सन २००६, २०१३ आणि २०२२ तसेच या वर्षी सुद्धा या भागात पुरपरिस्थीती निर्माण झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील घरांचे नुकसान होवून वित्तहानी झाली आहे. दरवर्षी सखोल भागात पूर परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणार्या संभाव्य पुरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
• भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पुरपरिस्थिती वर उपाययोजना करण्याची अधिवेशनात केली मागणी
या विषयाची गंभीरता लक्षात घेत राज्य शासनानेही पुरसंरक्षण भिंत बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्याबाबतचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले असून तसा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावात दाताळा पूल ते शांतीधाम या इरई नदी काठावरील परिसराची लांबी २.०० कि. मी. आहे. तसेच ज्या परिसरात पुराचा धोका पोहचत नाही तो भाग वगळुन उर्वरीत १.० कि.मी. लांबी मध्ये पुर संरक्षक भिंत व घाट बांधकाम प्रस्तावित करण्यात आलेले आहे. परंतु सदर पूर संरक्षण भिंतीची लांबी अतिशय कमी असल्याने शहरातील इतर भागात इरई नदी पात्रातील पाणी शिरून नेहमीप्रमाणे पूर परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे चंद्रपूर येथे दरवर्षी उद्भवणाऱ्या पुरामुळे होणारी जीवितहानी, पशुधन नुकसान, नागरिकांचे होणारे आर्थिक नुकसान, नागरिकांचे विस्थापन व स्थलांतरण तसेच आपत्ती व व्यवस्थापन वरील खर्च टाळण्याकरिता संपूर्ण इरई नदी परिसरात पुर संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास मंजुरी प्रदान करत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी सभागृहात बोलताना केली आहे.