खरंच स्त्री स्वातंत्र्य आहे का हो ?

          खरंच स्री स्वातंत्र्य तरी आहे का? असा प्रश्न विचारल्यावर काही लोकांना नक्कीच आतिशयोक्ती वाटेल व लोकं म्हणतील की कसे वेडे झाले हे गृहस्थ. स्री जर स्वतंत्र नाही तर ती कशी काय राष्ट्रपती बनली. ती जर स्वतंत्र नाही तर कशी काय अंतराळात गेली व ती जर स्वतंत्र नाही तर देशाची पंतप्रधान कशी बनली? बरोबर आहे. आज हीच स्री सर्व क्षेत्र पादाक्रांत करीत आहे. यावरुन स्री स्वतंत्र आहे असंच दिसतं. असं असतांना आमच्याच देशात स्रियांवर अत्याचार का होतो? स्री जर स्वतंत्र आहे तर तिच्यावर दिवसाढवळ्या बलात्कार का होतो? अन् ती जर स्वतंत्र आहे तर तिला जाळून का टाकलं जातं? आज स्री स्वातंत्र्य पाहता ब-याचशा स्रियांची परिस्थिती बिकटच आहे. ब-याचशा घरी आजही स्री स्वातंत्र्य नाही. चारदोन महिलांना स्वातंत्र्य असलं म्हणजे स्री स्वातंत्र्य नाही. याचं एक उदाहरण देतो. एखादी मुलगी जर कमी कपड्यात दिसली तर आपण तिला दोष देतो. टोमणे मारतो. याला स्रीस्वातंत्र्य म्हणता येणार नाही. कारण स्वातंत्र्याचा पुरेपूर अर्थ हा बंधनाची मुक्तता असा आहे. मग ती तोकडे कपडे घालो वा कशीही वागो. हेच ते स्वातंत्र्य. परंतु काही लोकं म्हणतात की हे स्वातंत्र्य आज देशाला अपेक्षीत नाही. स्वातंत्र्याचा मुळात अर्थ बंधनांची मुक्ती जरी असेल तरी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. हेच तत्व स्रीस्वातंत्र्याला लागू होतेय. स्री स्वातंत्र्य म्हणजे तोकडे कपडे घालणे नाही. तो स्वैराचार आहे. कारण त्यामुळं संस्कृती बिघडते. संस्कार बिघडतो. हे तत्व सर्व स्रीजातीला माहीत आहे. तरीही काही स्रिया नक्कीच नावबोटं ठेवतात. त्यामुळं त्या विषयावर न बोललेलं बरं. 

         आज स्री स्वतंत्र आहे. ती नोकरी करु लागली आहे. पुरुषांच्या बरोबरीने ती स्री आजच्या काळात पुरुषांपेक्षा जास्त पैसे कमवीत आहे. काही घरात ती स्री पुरुषांना कळसुत्री बाहूली ठरवीत आहे. याचाच अर्थ असा की अशा ठिकाणी काही घरात स्री स्वातंत्र्याचा ऊहापोह सुरु आहे. तर काही घरात ती स्री कितीही कमवीत असली तरी तिच्या कमविण्याला अर्थ नाही. ती बाहेरुन कार्यालयातून घरी आल्यावरही तिला घरी आपले स्वातंत्र्य उपभोगता येत नाही. काही घरात तिला आपल्या स्वतःच्या घरीच तिचा पती असलेल्या पुरुषांच्या गळ्यातील ताईतासारखं वागावं लागतं. बाहेर कार्यालयात गोष्टी सांगणारी ही स्री घरात मात्र पुरुषांच्या आज्ञेत वागते नव्हे तर वागतांना दिसते. याला स्री स्वातंत्र्य तरी म्हणता येईल काय? बाहेर काम करणारी हीच स्री कधी आपल्या पतीच्या नजरेच्या डोहातल्या संशयाच्या भोव-यात सापडते. याला स्रीस्वातंत्र्य म्हणता येईल काय? हीच स्री जेव्हा रस्त्यावरुन मार्गक्रमण करते. तेव्हा समाजातील काही नजरा तिचा पिच्छा करतात. तिच्याकडे वाकड्या नजरेनं पाहतात. याचाच अर्थ असा की तिला मनमोकळेपणानं रस्त्यावरुनही फिरता येत नाही. ना ती बसमध्ये सुरक्षीत आहे ना ती घरामध्ये. घरातही ती स्री आपल्या बापाच्याच व भावाच्याच नजरेची शिकार होते. ही वास्तविकता आहे. 

           स्री स्वातंत्र्य नाही आदियुगापासूनच. सीता निर्दोष असतांनाही तिची सत्त्वपरीक्षा घेतली गेली. रेणूकेला नाहकच बळीचा सामना करावा लागला. द्रौपदीला नाईलाजानं पाच पती स्विकारावे लागले. गांधारीला नाईलाजानं डोळ्याला पट्टी बांधावी लागली. संयोगीता व राणी पद्यावतीला जाळून घ्यावं लागलं आणि सक्षम असतांनाही ताराबाई स्वतः गादीवर न बसता आपल्या मुलाला म्हणजे तिस-या शिवाजीला गादीवर बसवावं लागलं. तेव्हा तो चार वर्षाचा होता. यावरुन स्री स्वातंत्र्याची कल्पना करता येते. येथील लोकांना गादीच्या वारसासाठी चार वर्षाचा पुरुष असलेला शिवाजी तृतीय चालतो. परंतु ताराबाई स्री असल्यानं चालत नाही. येथील लोकांना स्री वासनेसाठी चालते. परंतु तिची स्वातंत्र्यता वागण्यातून चालत नाही. आजही काही काही जातीतील स्रिया आजही डोक्यावर पल्लू घेवूनच दिसतात. तिची इच्छा नसतांना आजही तिला कपाळावर टिकल्या वा कुंकू लावावेच लागते. भांगावर कुंकू भरावाच लागतो. हातात बांगड्या घालाव्याच लागतात. एवढंच नाही तर गळ्यातही मंगळसुत्र घालावंच लागतं आणि पायात पैजणही. ज्या मंगळसुत्रानं गळ्यावर उन्हाळ्यात व्रण निर्माण होतात.

          हे सोळा शृंगार. हे सोडा शृंगार नाही वापरले तर त्या स्रीला दुषणे दिली जातात. संस्कृती व संसाराचा हवाला दिला जातो अन् आजही स्री कितीही शिकली का असेना, कितीही उच्च पदावर गेली का असेना, तिला पती मरणानंतर भांगावरील कुंकू मिटवावाच लागतो. हातातील बांगड्या फोडाव्याच लागतात आणि काही प्रमाणात पांढ-या साड्याही परीधान कराव्याच लागतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास सौंदर्याची राखरांगोळीच करावी लागते. कारण आपली ही संस्कृती. संस्कृतीसाठी स्रीला स्वतःच्या स्वातंत्र्याचा त्याग करावा लागतो. याला स्री स्वातंत्र्य म्हणता येत नाही. 

           सन १९४९ ला संविधान बनलं. संविधानात स्री समानतेच्या व स्वातंत्र्याच्या कलमा टाकल्या. परंतु स्री ख-या अर्थानं स्वातंत्र्य झाली का? याचं उत्तर नाही असंच आहे. स्री स्वातंत्र्य आहे की नाही हे मणीपूरच्या घटनेतून दिसून येतं. तिथं तर रोजच स्रीयांवर बलात्कार सुरु आहेत व रोजच स्रियांची हत्या केली जात आहे. दुसरं उदाहरण दिल्लीचं देता येईल की तिथं बसमध्ये प्रवास करतांना निर्भयावर बलात्कार झाला आणि हत्याही. तसं पाहता भारतातील ब-याचशा भागात स्रियांवर तासागणिक बलात्कार होतात व स्रिया तासागणिक मारल्या जातात. काही प्रकरणं उजेडात येतात तर काही लपतात कायमचे. हे झालं भारतातील. जागतिक स्तरावर अफगाणिस्तानचं उदाहरण देता येईल की तिथं स्रियांचा शिक्षणाचा अधिकार हिरावला. तसंच पाकिस्तानचं देता येईल की तिथं आजही स्रिला बुरख्यात राहावं लागतं आणि मुलांना अल्लाची देण म्हणत कितीतरी मुलांना जन्म द्यावा लागतो. त्या स्रिया वा तो परीवार शिकला असला तरी. असे बरेचसे देश आहेत की जिथं स्री स्वातंत्र्याची गळचेपीच होते. 

           महत्वाचं सांगायचं म्हणजे आज कितीतरी स्त्रियांच्या विचारांना धार्मीक रंग देवून त्यांच्या स्री स्वातंत्र्याची हत्या केली जात आहे. आपली संस्कृती व आपला संस्कार तिला समजावून सांगून तिला एकप्रकारे व्यवहारीक दृष्टीकोणातून गुलामच ठेवले जात आहे. जी स्री ऐकत नाही व स्वतःच स्वतःचा स्वातंत्र्यपणा सिद्ध करते. तिला समाज केवळ दुषणेच देत नाही. तर तिचं अपहरण करतो. तिला दलालांना विकतो. तिच्यावर बलात्कार करतो आणि हत्याही. हे सदोदीत घडत असलेली वास्तविकता आहे. ही वास्तविकता काही काही घरात आजही माहीत असल्यानं ती मंडळी संस्कृती जपतात. संस्कार पाळतात व नाईलाजानं स्रिला घरात बंदीस्त करुन एकप्रकारे स्री स्वातंत्र्याची हत्याच करतात. जरी स्रीस्वातंत्र्य असलं तरी आणि संविधान बनलं असलं तरी. आजही कितीतरी अशा स्रिया आहेत की ज्या स्वतः निर्णय घेत नाहीत तर पुरुषांना विचारुनच सर्व निर्णय घेत असतात. त्यांनी नकार दिला तर चूप बसतात. परंतु कोणतेच पाऊल पुढं टाकत नाही. 

            विशेष सांगायचं म्हणजे केवळ दोनचार स्रियांना स्वातंत्र्य असल्यानं चालणार नाही तर जेव्हापर्यंत तळागाळातील स्रियांमध्ये स्वतंत्र्यता दिसेल व त्या रात्री बेरात्री मुक्तपणे संचार करु शकतील. तेव्हाच ती ख-या अर्थानं स्वतंत्र्य झाली व तिला स्वातंत्र्य मिळालं असे म्हणता येईल. तेव्हापर्यंत स्री स्वातंत्र्य आहे वा ती स्वतंत्र आहे हे म्हणताही येणार नाही वा मांडताही येणार नाही. हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे

नागपूर, मो:९३७३३५९४५०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here