नागपूर मधील मेडिकल रुग्णालयात महिला डॉक्टराबरोबर छेडछाड, ॲाक्सिजन प्लांट कर्मचाऱ्यांवर आरोप.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर :- नागपुर मधून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात महिला डॉक्टरची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ॲाक्सिजन प्लांट उभारणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच छेड काढल्याचा आरोप आहे. छेड काढणारे आरोपी हे डॉक्टर महिलेचा पाठलाग करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर निवासी डॉक्टरांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात ब्रदरला झालेली मारहाण, महिला डॉक्टरविषयी आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याबद्दल निवासी डॉक्टरांनी इंजिनीअरला दिलेला चोप या घटना ताज्या असतानाच महिला डॉक्टरची छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
तक्रारदार महिला डॉक्टर मेडिकल रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागात कार्यरत आहे. मेडिकलच्या परिसरात ग्लोबल सर्व्हिसेस या खासगी कंपनीकडून लिक्वीड ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जात आहे. येथील दोन-तीन कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संबंधित महिला डॉक्टरचा पाठलाग करत होते. सुरुवातीला डॉक्टरने त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र गुरुवारी दुपारी ती ॲाक्सिजन प्लांट समोरुन जात असताना पुन्हा त्यांनी छेडछाड केल्याचा आरोप होत आहे.
घाबरलेल्या महिलेने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाला याची माहिती दिली. जवानांनी दोघांना पकडून वैद्यकीय उपाधीक्षकांसमोर उभे केले. त्यांनी संबंधित कंपनीला पत्र लिहून दोन्ही कामगारांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या प्रकारामुळे महिला डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण असून निवासी डॉक्टरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नागपुरात वरिष्ठ डॉक्टरकडून अतिप्रसंग
दरम्यान, वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला होता. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या.
नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला गेला.