विरार मध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने केली आत्महत्या.

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.26 ऑगस्ट:- मुंबईच्या उपनगरा मधून एक मनहेलवणारी खळबळजनक बातमी समोर आली आहे. विरारमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यापैकी पतीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या पत्नीने बुधवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विरार पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
काही दिवसांपूर्वी नवापूर येथे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे ही घटना घडली आहे. मनवेलपाडा येथील दादूस क्लासिक या इमारतीमध्ये नरेंद्रसिंह परमार वय 24 वर्ष आणि त्याची पत्नी संतोष परमार वय 22 वर्ष हे दोघे भाड्याने राहत होते. त्यांचे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले होते व मूलबाळ नव्हते. काही दिवसांपूर्वी संतोषचा लहान भाऊ यांच्यासोबत राहण्यासाठी आला होता.
तिचा लहान भाऊ बुधवारी सकाळी कामावरून आल्यावर दरवाजा उघडा नसल्याचे त्याने पाहिले. दरवाजा उघडल्यावर बहिणीने गळफास घेतलेला मृतदेह तर भावजीचा मृतदेह त्याने पाहिल्यावर विरार पोलिसांना घटनेची माहिती दिली. विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
नरेंद्रसिंहच्या पोटात मंगळवारी संध्याकाळी खूप दुखत असल्याने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. रात्री 11 वाजताच्या सुमारास तो घरी आला. परत पोटात दुखत असल्याने पत्नीने त्याला इनो दिले; पण काही उपयोग झाला नाही व त्याचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून पत्नी संतोष घाबरली आणि तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.