पडोली चौकातील सुरक्षा उपाय, चौक सौंदर्यीकरण व संबंधित कामासाठी 5 कोटी 21 लक्ष 61 हजार रू. निधी मंजूर
तारा आत्राम
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
95116 20282
चंद्रपूर :वरोरा-चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी राष्ट्रीय महामार्ग 930 वरील पडोली चौकातील सुरक्षा उपाय, चौकाचे सौंदर्यीकरणाच्या कामासाठी रस्ता सुरक्षा निधी अंतर्गत 5 कोटी 21 लक्ष 61 हजार रू. निधीला मंजूरी देण्यात आली आहे. या संदर्भात वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा नियंत्रण समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.
चंद्रपूर-नागपूर मार्गावरील पडोली चौकात मोठया प्रमाणावर वाहतुक असते. प्रामुख्याने जड वाहनांच्या वाहतुकीमुळे या चौकात मोठया प्रमाणावर अपघात होत असल्यामुळे या रस्त्यावर सुरक्षा उपाय संबंधीची कामे करण्यात यावी यासाठी माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी आमरण उपोषण पुकारले होते. हे उपोषण सोडविताना सदर रस्त्यावर वाहतुकीशी संबंधित सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिले होते. त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचा 5 कोटी 21 लक्ष 61 हजार रू. किंमतीचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांच्या मार्फत परिवहन आयुक्तांना पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता.
दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा नियंत्रण समितीची बैठक मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीत सदर 5 कोटी 21 लक्ष 61 हजार रू. किंमतीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावाअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेव्हींग ब्लॉक बसविणे, आरसीसी ड्रेन, डिव्हायडर रेलींग, ट्रॅफीक सिग्नल्स, बिल बोर्डस, बसस्टॉप, पोलिस चौकी, सोलार स्ट्रीटलाईट्स, रोड स्टडस, रिफ्लेटीव्ह बोर्ड आदी सुरक्षा विषयक उपाययोजना तसेच पडोली चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग 930 वरील पडोली चौकातील ही महत्वपूर्ण समस्या मार्गी लागली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.