रायगड पोलिसांची डिजिटल झेप : तक्रारींसाठी ‘दृष्टी व्हॉट्सअॅप चॅट बॉक्स’

रायगड पोलिसांची डिजिटल झेप : तक्रारींसाठी ‘दृष्टी व्हॉट्सअॅप चॅट बॉक्स’

सुरक्षेसह गुन्हेगारीवरही लक्ष; रायगड पोलिसांचा उमक्रम सुरू

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी रायगड पोलिसांनी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. ‘दृष्टी व्हॉट्सअॅप चॅट बॉक्स’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या तक्रारी, सूचना व माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे.

या माध्यमातून नागरिकांना केवळ उत्सव काळातील गर्दी, वाहतूक कोंडी किंवा संशयास्पद हालचालींचीच नव्हे तर रोजगार मटका, आवेद्य (बेकायदेशीर) धंदे, अमली पदार्थांचा व्यापार यासारख्या गुन्हेगारी प्रकारांविरोधातही तक्रारी नोंदवता येतील. पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून या संदेशांना थेट प्रतिसाद दिला जाणार असून संबंधित विभागाकडून आवश्यक ती तातडीची कारवाई होईल.

उत्सवांच्या काळात सुरक्षेची व कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी वाढते. अशा वेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिक आणि पोलिस यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्हा पोलिस अधीक्षकांनी नागरिकांना या चॅट बॉक्सचा योग्य वापर करून सुरक्षा व्यवस्थेसोबतच समाजातील अवैध धंदे व अमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.