मार्शल कामगार युनियनच्या संघर्षाला यश

मार्शल कामगार युनियनच्या संघर्षाला यश

नाशिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनीकडून कामगारांना कौटुंबिक मेडिक्लेम सुविधा

ज्ञानेश्वर तूपसुंदर
नाशिक जिल्हा प्रतिनिधी
मो. 8668413946

नाशिक, दि.२७ नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांच्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना कौटुंबिक आरोग्य विमा (मेडिक्लेम पॉलिसी) मिळणार आहे. मार्शल संघटित-असंघटित कामगार युनियनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून या निर्णयाचे कामगारांकडून स्वागत करण्यात येत आहे. कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासून कामगार आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्य सुरक्षेसाठी विमा सुविधेची मागणी करत होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर मार्शल संघटित-असंघटित कामगार युनियनने पुढाकार घेतला. युनियनच्या नेत्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा, बैठक तसेच आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा प्रश्न सोडवला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमास कंपनी व्यवस्थापनातील चित्तरंजन राठा, डायरेक्टर कर्नल रेगे, समीर रेगे, महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी धनाईत, बाजीराव माळी, बोरसे, मते, तसेच युनियनचे संस्थापक प्रशांत खरात, अध्यक्ष मिलिंद खिल्लारे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“हा विजय केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नाही, तर असंघटित कामगारांच्या हक्कासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आम्ही पुढेही कामगारांच्या मागण्यांसाठी लढत राहू,” असे युनियनच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नाशिक महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून शहरातील इतर कंपन्यांनाही अशा प्रकारची आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे कंपनीतील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुरक्षेची हमी मिळाली असून कामगारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. हा निर्णय कामगार कल्याणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.