नागपुर अपघात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी*

50

*नागपुर अपघात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी*

नागपूर : दारूच्या नशेत असलेल्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांना जोरदार धडक मारली. त्यानंतर अनियंत्रित ट्रक घरावर जाऊन धडकला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. घराचेही मोठे नुकसान झाले. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा चौकाजवळ गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. तत्पूर्वी, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कंटेनर चालकाने दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीस्वाराचा करुण अंत झाला.
पोलीस हवालदार ईश्वर रामचंद्र बाबल यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार एमएच २८/ बीबी १५८९ क्रमांकाच्या ट्रकचालक आरोपीने निष्काळजीपणे वाहन चालवून अमरावती मार्गावर रस्त्यावर पायी जात असलेल्या जीवन लक्ष्मण कनोजिया वय ४५, रा. न्यू फुटाळा आणि संजय हरडे वय ३८, रा. न्यू फुटाळा या दोघांना जोरदार धडक मारली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या घराला धडक दिली. यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी वातावरण संतप्त झाले. नागरिकांनी धाव घेऊन जखमींना जीवन कनोजिया आणि संजय हारोडे यांना रुग्णालयात भरती केले. तेथे कनोजिया यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी हरडे यांची प्रकृती गंभीर आहे. अंबाझरी पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू आहे.
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास नाका नंबर पाचसमोर भीषण अपघात घडला. मौदा येथील वाकेश्वर बुद्धविहाराजवळ राहणारे अनिल खुशाल वालकर (वय ४४) हे गुरुवारी नागपुरात आले होते. ते आपल्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीने दुपारी ४ च्या सुमारास मौदा गावाकडे परत जात असताना कंटेनर क्रमांक एचआर ३८/ एस ९२०० च्या आरोपी चालकाने वालकर यांच्या अ‍ॅक्टिव्हाला मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मंगल बकाराम पाटील (वय ५६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.