*आत्मनिर्भरच्या नावाखाली खासगीकरणाचा कट.*

वर्धा:- केंद्र शासनाने देशाला ‘आत्मनिर्भर बनो’ आणी ‘खासगीकरण’ करो ही नितीचा अंमल सुरु केला आहे. त्याकरिता देशतील सरकारी व सार्वजनिक उपक्रमांचे सरसकट खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरु केला आहे. रेल्वे, टपाल खाते, भारतीय जीवन विमा, राष्ट्रीयकृत बँका, डिफेन्स, कोल, पेट्रोलीयम यासह शिक्षण व आरोग्य क्षेत्र उद्योगपतींना विकण्याचा घाट रचला आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या या भूमिकेच्या विरोधात देशातील ११ कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता. या संपामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसह सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून केंद्र शासनाचा निषेध केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांनी निदर्शने करुन शासनाचा निषेध नोंदविला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जि.प.समोर आंदोलन
देशात सरकारने खासगीकरणाचा सपाटा सुरु केला असून नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी बघता सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे संवैधानिक मूल्यांना हरताळ फासला जात आहे. संपूर्ण शिक्षण कॉपोर्रेट क्षेत्राकडे गहाण ठेवून सामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणातून हद्दपार करण्याची नीती दिसून येत आहे. अशा या अवसानघातकी धोरणास विरोधात देशभरातील कामगार संघटना, सरकारी व निम-सरकारी कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला.
या संपात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनेही सहभाग नोंदवून जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व आयटकच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व विजय कोंबे, दिलिप उटाणे, सिद्धार्थ तेलतुंबडे, मनिष ठाकरे, मनोहर डाखोळे, प्रशांत निंभोरकर, सुधीर सगणे, यशवंत कुकडे, सुधीर ताटेवार, प्रदीप देशमुख, चंद्रशेखर ठाकरे, दीपक शेकार, श्रीकांत केंडे, अरूण वाके, भास्कर पोंगाडे, योगेश भडांगे, प्रदीप मसने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here