लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रात अजरामर कार्य : खासदार बाळू धानोरकर
जिवती येथे पार पडला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा
✍तारा आत्राम✍
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
95116 20282
चंद्रपूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लोकनाट्य, चित्रपट यासारख्या असंख्य प्रतिभासंपन्न साहित्याची निर्मिती करून साहित्याच्या क्षेत्रात अजरामर कार्य केले आहे. देश विदेशातील लोकप्रिय असून त्यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य अजरामर असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
आज जिवती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी पालकमंत्री रमेश बागवे, आमदार सुभाष धोटे, माजी नगराध्यक्ष राजुरा अरुण धोटे, जेष्ठ काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, डॉ. अंकुश गोतावळे, जी. एस. कांबळे, प्रा. सुग्रीव गोतावळे, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, देविदास कांबळे, दत्ता तोगरे, गणेश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग, दत्ता गायकवाड, केशव भालेराव, पंढरी गायकवाड यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अथक परिश्रम, जिद्द, सचोटी आणि असंख्य संकटाचा सामना करून त्यांनी हे साहित्य निर्मितीचे महान कार्य निर्माण केले आहे. त्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा भावी पिढीने जोपासला पाहिजे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रमेश बागवे म्हणाले कि, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी फार मोठे आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र कधीही त्यांना विसरणार नाही. त्यांच्या विचाराचे पाईक होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार सुभाष धोटे म्हणाले कि, या भागातील जनतेच्या मनात नेहमी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार तेवत राहावे याकरिता त्यांच्या पुतळा उभारण्यात आला. नागरिकांनी देखील त्यांच्या विचाराचा वारसा पुढच्या पिढीला सोपविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.