दोष निसर्गाचा की…?

            पाऊस येतो. कधी कमी येतो. तर कधी जास्त प्रमाणात येतो. कधी रौद्र रुप दाखवतो तर कधी सौम्य प्रमाणात येतो. कधी कधी तर येतच नाही. असाच पाऊस दोन दिवसापुर्वी नागपूरात आला व त्या पावसानं रौद्र रुप धारण केलं. त्यातच अनेकांची दुकानं बुडाली. त्या दुकानातील माल बुडाला व अनन्वीत नुकसान झालं. 

           नुकसान पाहता प्रशासनानं संयम दाखवून सहानुभूती मिळविण्यासाठी काहींना मदत केली. काही दुकानदारांना आश्वासन दिलं की ते पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देणार. परंतु लोभ एवढा की ते दुकानदार म्हणतात. पन्नास हजारांनी काय होतं?

          नुकसान…….तसं पाहता दुकानदार वा लोकांनी नुकसानभरपाई सरकार वा प्रशासनाला मागूच नये. कारण पाऊस येणं वा आणणं हे प्रशासनाचं काम नाही वा त्याला आणणं हा बदल मानवनिर्मित नाही की प्रशासनाचा दोष दिसून येईल. तो दोष निसर्गाचा आहे. मग त्याच्या रौद्र रुप धारण केल्यानं जर नुकसान होत असेल तर त्याची नुकसानभरपाई प्रशासन वा सरकारनं का बरं करावी? तरीही प्रशासन एक सहानुभूती म्हणून जी काही मदत करीत आहे. त्याचा स्विकार करावा. उलट सुलट उत्तरे देवू नयेत व म्हणू नये की पन्नास हजारानं काय होणार. आणखी जास्त पाहिजे. 

           आपला भारत देश. सुजलाम सुफलाम आहे आपला भारत देश. हा देश वैविध्य अशा विविधतेने नटलेला आहे. इथं मोठमोठे डोंगर आहेत. मैदानी प्रदेश आहेत. पर्वतरांगेच्या शृंखला आहेत. मोठमोठ्या नद्या आहेत. एवढंच नाही तर काही भागात पिकपाणीही बरोबर पिकतं. त्यातच देश स्वावलंबी आहे व कुणासमोर भीक मागत नाही. तसेच या देशातील लोकं सहनशील आहेत. ते एवढे सहनशील आहेत की उन, वारा पाऊस आधीपासूनच सहन करतात. असे असतांना दोन दिवसापूर्वी पाऊस आला. त्यात नुकसान झालं. त्यात ना प्रशासनाचा दोष ना कोणत्या माणसाचा. तरीही प्रशासनाला दोषी धरुन मदत मागितली असली तरी खरा दोष हा निसर्गाचा आहे व त्याचबरोबर दोष आहे माणसांचा की माणसानं आपली घरे सुरक्षीत अशा ठिकाणी का बांधली नाहीत किंवा आपलं सामान सुरक्षीत अशा ठिकाणी का ठेवलं नाही? हा प्रश्न आहे. तरीही ही मदत देणे याचा अर्थ एखाद्या विवाहीत दांपत्यानं आपला संसार सुखाचा सुरु करावा म्हणून तिला जी मदत केली जाते, ती देणे होय. त्यात अशी मदत देत असतांना जास्त लोभ करायला नको आणि मदत मागायचीच असेल तर ती निसर्गाला मागावी. म्हणावं की बाबारे, तू असं रौद्ररूप दाखवीत जावू नकोस. आम्हाला त्रास होतोय. परंतु यावर निसर्ग तरी ऐकणार आहे का? तर याचं उत्तर नाही असंच येईल. आता यात कोणी अंधश्रद्धाही आणतात.

म्हणतात की मागील महिन्यात याच तेवीस तारखेला चांद्रयान चंद्रावर पोहोचला आणि आज त्याच तारखेला म्हणजेच तेवीस सप्टेंबरला पावसानं आपलं रौद्ररूप दाखवलं. कदाचीत ते बरोबरही असू शकतं. कारण निसर्ग अशी एक शक्ती आहे की ज्या शक्तीसमोर माणसाची हार होते. चंद्र, सुर्य, आकाशगंगा, आकाश, ग्रहतारे, झाड, पर्वत, जमीन, प्राणी आणि पाऊसपाणीही. हे निसर्गातील घटक. या घटकांशी छेड काढणं कदाचीत निसर्गालाही आवडत नसेलच. झाडं तोडल्यानं पाऊस येत नाही. जमीनीवर सिमेंटीकरण केल्यानं त्या भागात पाऊस येत नाही. पर्वत पोखरल्यानं वा पर्वताची छेड काढल्यानं भुस्खलन होतं. जमीनीला पाण्यासाठी कुपनलिका वा विहिरीचे गड्डे केल्यानं भुकंप होतो. तसाच जमिनीखालून कोळसा काढत असतांना तो कोळसा काढल्यानंतर जी पोकळी तयार होते. ती कोसळून पर्वतरांग अर्थात घडीचे पर्वत तयार होतात. याचाच अर्थ असा की जर या निसर्गाला एक मानव संबोधलं गेलं आणि त्याला गड्डे करुन वा सिमेंटीकरण करुन त्याच्या शरीराला गुदगुल्या करणं वा त्याची छेड काढणं याला जर आपण आपलं सौंदर्य मानत असलो तर ते निसर्गाला खपेलच असं नाही. अशातच ते न खपल्यानं निसर्ग आपलं रौद्ररूप दाखवणारच. जसं चांद्रयान चंद्रावर तेवीस तारखेला भारतानं पाठवला म्हणजेच निसर्गाचा घटक असलेल्या चंद्राची छेड काढली हे काही निसर्गाला खपले नसावे. म्हणूनच तब्बल एक महिण्यानंतर म्हणजेच तेवीसच तारखेला त्या निसर्गानं प्रायोगिक तत्त्वावर नागपूरात आपलं रौद्ररूप दाखवलं असावं व इशारा दिला असावा की जर तुम्ही आता सुधारले नाही तर मी संपुर्ण सृष्टीच नष्ट करणार. 

          माणसाला काय आहे. माणसे नवनवे शोध लावतात. कशासाठी? तर आपल्या सुखासाठी. जे निसर्गाला पसंत नाही. माणसानं आपली घरे बांधण्यासाठी कापलेलं लाकुडही निसर्गाला पसंत नाही. माणसानं पिण्यासाठी पाणी मिळवीत असतांना खोदलेली विहिरही निसर्गाला पसंत नाही. तसंच अलिकडील बाजारात आणलेला मोबाईलही निसर्गाला मंजूर नाही. त्याला वाटते की मी सृष्टी जन्मास घातली ना. मग मीच त्यांचं पालनपोषण आपल्या पद्धतीनं करणार आहे. तुमच्या पद्धतीनं नाही. तुम्ही त्यात हस्तक्षेप करु नये. परंतु माणूस त्यात हस्तक्षेप करीत असल्यानं कधी कधी निसर्ग असंच आपलं रौद्ररूप दाखवीत असतो व चेतावणी देत असतो की सावधान, तुम्ही माझ्या जन्मास घातलेल्या घटकांच्या वाट्याला जाल तर…….मी संपुर्ण संसारच मिटवून टाकेल. तरीही मानवजात त्याचं काही ऐकत नाही. त्यानं दगडालाही जीव फोडला आणि आता माणूसही जीवंत कसा करता येईल याचा शोध लावत आहे आणि हे जेव्हा घडेल व मेलेला माणूस जेव्हा जीवंत करण्याचं कसब माणसाला जेव्हा ज्ञात होईल. तेव्हा काही काळातच हा निसर्ग हिरवागार राहणार नाही तर ही सृष्टी पुर्णच नष्ट होईल. ना प्राणी जीवंत दिसणार. ना कोणते जीव, ना झाडं आणि ना इवलंसं रोपटंही. फक्त नि फक्त जीवंत राहिल येथील जमीन व त्या जमीनीवर असलेले दगडधोंडे, पर्वत, मैदान व पठारी प्रदेश आणि संपुर्ण पाणी पसरलेलं असणार पृथ्वीवर. तसंच आकाशात चंद्र, सुर्य असणारच. जसे आज दिसतात तसे. परंतु त्यांना छेडणारा वा गुदगुल्या करणारा मानव नसणारच. हे सत्य आहे. 

          आज ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांनी पश्चाताप करु नये. प्रशासन मदत करेलच एक सहानुभूतीपूर्वक. परंतु समजा नाही मदत मिळाली तरी त्याचा उहापोह करु नये. वाटून घ्यावं की आपल्या नशिबात असंच प्रारब्ध लिहिलं असेल, जे निसर्गाला मंजूर नसेल. आपण निसर्गाला त्रास दिला असेल. म्हणूनच निसर्गानं आपल्याशी असं केलं असावं. कारण कोणी कितीही आपल्याला देईल, तरी आपल्या आयुष्यभर गरजा पुर्ण होत नाही. जरी माणूस मरतांना काहीही नेत नसला तरी. तेच लक्षात घेऊन पुढील आयुष्य सुरु करावं. जेणेकरुन तुम्हाला स्वतः समाधान वाटेल व तुम्ही आनंदानं जीवन जगू शकाल. जरी प्रशासनाची वा कोणाची मदत नाही भेटली तरी.

अंकुश शिंगाडे, नागपूर

मो: ९३७३३५९४५०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here