महिलांची एकजूट क्रांती घडवेल चित्रलेखा पाटील यांचा विश्‍वास

140
महिलांची एकजूट क्रांती घडवेल चित्रलेखा पाटील यांचा विश्‍वास

महिलांची एकजूट क्रांती घडवेल
चित्रलेखा पाटील यांचा विश्‍वास

महिलांची एकजूट क्रांती घडवेल चित्रलेखा पाटील यांचा विश्‍वास
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारुच्या आहारी घालविण्याचा प्रकार घडतो. त्याचा नाहक त्रास आई, पत्नी, मुलगी, व मुलांना होतो. दारुमुळे कुटूंब उध्वस्त होतात. दारुचे व्यसन लावून चिखलात लोळवणार्‍यांना महिलाच त्यांची जागा दाखविणार आहे. पाणी, रस्त्याचा प्रश्‍न गंभीर आहे. असा आरोप करीत चित्रलेखा पाटील पुढे म्हणाल्या, पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरविणार आहे. महिलांची एकजूट एक वेगळी क्रांती घडविणार असा विश्‍वास शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला संवाद मेळाव्याचे आयोजन सहाण बायपास येथील श्रीगणेश मंगल सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, अलिबाग नगरपरिषदेच्या माजी सदस्या तथा रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, संजना कीर, पंचायत समितीच्या माजी सदस्या अश्‍लेषा नाईक, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, शेकाप कामगार राज्य समितीचे प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, सौंदर्या पोईलकर, विद्या मगर, लहानी नाईक, रेखा मगर, पुनम वर्तक आदी मान्यवरांसह महिला बचत गट फेडरेशनचे पदाधिकारी, सभासद, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या व सहाण, कावीर, बामणगाव, खानाव, आक्षी, ढवर, नवेदर बेली, बेलकडे, रेवदंडा, नागाव, चौलमधील असंख्य महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या, डावा व पुरोगामी विचारांचा पक्ष नेहमी महिलांना समान हक्क देणारा आहे. महिलांना पुढे नेणारा पक्ष आहे. महिला सक्षम बनल्या पाहिजे. त्यांना चुल व मुल या पलिकडे ही जगता आले पाहिजे. त्या स्वालंबी झाल्या पाहिजे परंतु आजही आपल्या समाजात स्त्री – पुरुष समानता दिसून येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. महिलांसाठी समाज व्यवस्थेचे वातावरण पोषक नाही ही मोठी चिंतेची बाब आहे.
महिलांमध्ये प्रचंड ताकद आहे. त्या घराबरोबरच देश, राज्य, जिल्हा तालुका, ग्रामपंचायतीचा कारभार सक्षमपणे चालवू शकतात.
शेतकरी कामगार पक्षाने अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे. कोविडसह अन्य आपत्तीच्या काळात गोरगरीबांसाठी काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये नेत्र तपासणीपासून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया, मुली शिकल्या पाहिजे या भूमिकेतून काम करताना त्यांच्यासाठी सायकली वाटप केल्या आहेत.
सरकारने लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना दीड हजार रुपये दिले. पण दुसर्‍या बाजूला सिलेंडरसह अन्य वस्तूंची महागाई गगनाला भिडली आहे. त्याकडे मात्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. निवडणुका समोर ठेवून अमिष दाखविण्याचे काम सरकार करीत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर आहे. महिला, तरुणींवर अत्याचार होत असताना त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होत नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे.
अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी गाव, तालुका पातळीवर महिलांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. महिलांनी ठामपणे उभे राहून या विकृतीविरोधात लढा देणे ही काळाची गरज आहे.
आगामी काळात येणार्‍या कंपन्यांनी शेतकर्‍यांना योग्य भाव दिला पाहिजे. स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे. जिल्ह्यात अनेक कंपन्या आहेत. विशेष म्हणजे उसर भागात गेल कंपनी आहे. या कंपनीने स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र खुले केले पाहिजे ही आपली प्रामुख्याने मागणी आहे.
अलिबाग हे पर्यटनाचे प्रमुख क्षेत्र आहे. आक्षी, नागाव, मुरूड, रेवस, किहीम मांडवा या भागात पर्यटनातून महिलांना चांगले रोजगार मिळावे यासाठी प्रशिक्षण देण्याचा एक मानस आहे. मच्छीमार महिलांना उभारी देण्यासाठी खंबीरपणे काम करण्याची गरज आहे.
शेकाप हा गोरगरीबांना केंद्र बिंदू ठेवून काम करणारा पक्ष आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळणार होते. परंतु विरोधकांनी निवडणूकीचे कारण दाखवून भरतीला स्थगिती आणून बेरोजगारांच्या पोटावर पाय दिला आहे. त्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारीदेखील आहे.
———-

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
महिला संवाद मेळाव्याच्या निमित्ताने पंचक्रोशीतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सहकारी, बँकीग, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
——————-