गेल कंपनीत चोरी
सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास; कंपनीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- उसर येथील गेल कंपनीमध्ये चोरी करण्यात आली. सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या पेट्रोलिअम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली गेल कंपनी काम करीत आहे. उसर येथे गेल कंपनी असून, या कंपनीच्या दुसऱ्या टप्प्यातील पॉलिमार प्रकल्पाचे काम गेल्या चार वर्षापासून सुरु आहे. प्रकल्पाचे काम चांगल्या पध्दतीने व्हावे, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कंपनीच्या परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस दलाच्या अखत्यारित येणाऱ्या राज्य औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांमार्फत कंपनीतील सुरक्षा राखण्याचे काम केले जात आहे. कंपनीत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांबरोबरच कामगारांची देखील तपासणी सुरक्षा रक्षकांच्या मार्फत केली जात आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा मानला जात आहे. मात्र, तरीदेखील या कंपनीत सुरक्षा रक्षकांना चकवा देत काही वस्तूंची चोरी होत असल्याची बातमी वृत्तपत्र मध्ये प्रसिद्ध ही झाली होती. मात्र, कंपनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने सप्टेंबर महिन्यामध्ये कंपनीतील कामासाठी असणारी 95 मीटरची कॉपर केबल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. तब्बल सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. कंपंनीमधील मोकळ्या जागेतील पाईप यार्ड या ठिकाणी ठेवलेली केबल चोरल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नामदेव आंगज अधिक करीत आहेत.
चोरी करणारे मोकाट
कंपनीत कॉपर कॉईलची चोरी होऊन अनेक दिवस उलटून गेले आहेत. कंपनीतील कामगारांची तपासणी पोलिसांमार्फत केली जात आहे. मात्र, अजूनपर्यंत त्याचा सुगावा लागला नाही. चोरी करणारे मोकाट आहेत. त्यांचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी ठरतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.