मित्रा बरोबर फोनवर बोलते म्हणून, बापाने घातल्या मुलीला गोळ्या
जन्मदात्या बापानेच 17 वर्षीय मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
उत्तर प्रदेेेश:- फीरोजाबादमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीच्या हत्येचा उलगडा करण्यात यूपी पोलिसांना यश आले आहे. नवरात्रौत्सवात मध्यरात्री मुलीची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपीला पकडले आहे. या मुलीची हत्या तिच्या जन्मदात्यानेच केल्याच समोर आल आहे. या प्रकरणी संशयावरून अटक केलेले तिघे निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी बापानेही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास शहरातील रसूलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनगरमध्ये बॅटरी स्क्रॅपचे व्यावसायिक अजय खटिकच्या 17 वर्षीय मुलगी ईशू हिची घरात गोळ्या घालून हत्या झाली होती. ईशू 12 वीत शिकत होती. तिच्या डोक्यात गोळी घालून तिची हत्या करण्यात आली होती. व्यावसायिक मनीष चौधरी, सोपाली यादव, गौरव चक आणि अन्य तीन-चार जणांनी घरात घुसून हत्या केल्याची तक्रार अजय खटिक याने दिली होती.
पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी रात्री उशिरा मनीषला ताब्यात घेतले होते. मात्र, आपला या घटनेशी काहीही संबंध नाही, असे त्याने पोलिसांना सांगितले. तर सोपाली आणि गौरवला शनिवारी रात्री ताब्यात घेतले होते. मुलीचा बाप अजय आणि त्याचा भाऊ विजयच्या जबाबानंतर पोलिसांचा संशय बळावला होता. आरोपींना हातात पिस्तुल घेऊन खोलीतून पळताना पाहिले होते, असा आरोप त्याने केला होता. मात्र, निर्दोष असल्याचे तिघांचे म्हणणे होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगी मित्रांसोबत फोनवर बोलत असल्याचा संशय तिच्या बापाला होता. घटनेच्या रात्री ईशू हिने आपल्या मित्रांसोबत फोनवर गप्पा मारल्या. याबाबत अजयला समजले आणि तो संतापला. रात्री 11 वाजता ईशू बहीण आणि भावासोबत खोलीत अभ्यास करत होती. अजयने तिला खोलीत बोलावून घेतले आणि मित्रांशी का बोलते अशी विचारणा केली. तिने नकार दिल्यानंतर अजय संतापला आणि त्याने तिच्या डोक्यात गोळ्या घालून तिची हत्या केली. या गुन्ह्याची कबुली आरोपी बापाने पोलिस चौकशीत दिली आहे.