Home latest News मतदारांचे स्टॅम्प पेपर वरील शपथपत्र करारनाम्याने उमेदवारांमध्ये खळबळ
मतदारांचे स्टॅम्प पेपर वरील शपथपत्र
करारनाम्याने उमेदवारांमध्ये खळबळ
अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र. 7715918136
पनवेल : सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया जोर धरू लागत असताना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात एक वेगळीच पण ऐतिहासिक लोक चळवळ उभी राहिली आहे. नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेऊन स्टॅम्प पेपरवर ‘ शपथपत्र करारनामा ‘ तयार केला आहे. नगरसेवक व नगराध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्या सर्वच प्रभागातील अपक्ष व प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना सदर करारनामा लिहून देण्याची मागणी करुन त्याचे पालन करण्याच्या अटी शर्ती नुसार बंधनकारक केले आहे. ह्या अभुतपुर्व अभिनव उपक्रमाने सगळ्याच उमेदवारांची झोप उडाली असून , सदर करारनामा सध्या साकोली पासुन नागपूर, पुणे, नाशिक पर्यंत व्हायरल झाला आहे.
संबंधित करारनाम्यात उमेदवाराने स्पष्टपणे नमुद करायचे आहे की, निवडुन आल्यानंतर कोणतेही टेंडर, कंत्राट , कमिशन खोरी , भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करणार नाही. निवडुन आल्यानंतर प्राप्त झालेला निधी पुर्णपणे प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने जनतेच्या हितासाठी वापरणार तसेच कोणतीही बेकायदेशीर कामे आढळल्यास त्याची तक्रार स्वतः च पोलिस ठाण्यात नोंदवावी लागेल. अशावेळी कोणतेही कार्यकर्ते सोबत नसावेत . नागरिकांना सोबत घेऊनच कोणतेही पाऊल उचलावे लागेल. प्रभागातील मतदार असलेल्या नागरिकांच्या वर्गणीतुन खरेदी केलेल्या स्टॅम्प पेपरवर उमेदवारांना स्वाक्षरी करावी लागणार असल्याने सदर करारनाम्यास कायदेशीर बंधन येते आहे.
म्हणुनच अनेक उमेदवार ह्या करारनाम्याला टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. करारनाम्यातील सर्वात कठोर तरतूद म्हणजे जर निवडुन आल्यानंतर उमेदवाराने वचनभंग केला, गैरव्यवहार केला अथवा जाहिरनाम्याचे उल्लंघन केले तर त्याने तात्काळ राजीनामा देऊन पोलिस ठाण्यात स्वतः वर गुन्हा दाखल होऊ द्यावा, मात्र यादरम्यान जर त्याने काही चलाखी करण्याचा प्रयत्न केला तर प्रभागातील सर्वच मतदार नागरिक तीव्र आंदोलन करुन पोटनिवडणूक घेण्यास शासन प्रशासनाला भाग पाडणार.भारतीय राजमुद्रा असलेल्या स्टॅम्प पेपरचे उल्लंघन झाल्यास थेट फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे भ्रष्टाचाराचा ‘ व्यवसाय ‘ करण्याच्या इराद्याने निवडणूकीत उतरलेल्या बहुतेक उमेदवारांची खरी धांदल उडाली आहे.
त्याच अनुषंगाने आता उमेदवारांची झोप उडवणा-या सदर भ्रष्टाचार विरोधी लोक चळवळीला समाज माध्यमांवर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी हा अभिनव उपक्रम शंभर टक्के खरा, लोकहिताचा आणि भ्रष्टाचार विरोधातील योग्य पाऊल आहे. असे म्हणत समर्थन केले आहे. युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकारामुळे हा करारनामा मोठ्या प्रमाणात प्रसिध्द झाला आहे. प्रत्येक प्रभागातील जागरूक मतदार उमेदवारांना थेट भेटुन हा करारनामा देत आहेत आणि त्यावर स्वाक्षरीची मागणी करत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सुरू झालेली ही मोहीम केवळ एक करारनामा नसुन लोकशाहीतील पारदर्शकतेचा नवा अध्याय ठरला आहे. निवडणूक प्रचार तापत असताना ह्या उपक्रमाने खळबळ माजली असुन संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जनतेचा एकच संदेश पुढे आला आहे. आम्हाला ” विकास हवा, भ्रष्टाचार नको ” आणि त्यासाठी स्टॅम्प पेपरवर लिखित हमीच हवी आहे.