श्रीवर्धन नगरपरिषदेत चौरंगी महायुद्ध!
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेचा विराट हल्ला… जनतेचा कौल कोणाला?
निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूक २०२५ चुरशीला पोहोचली असून यंदा पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने चौरंगी महाभिडत रंगताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याप्रमाणे ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धनमध्ये यंदा शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची सरशी वातावरण तापवत आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रवींद्र चौलकर यांच्या राजकीय गुगलीमुळे श्रीवर्धन नगरपरिषदेवरील सत्ता अनेक वर्षे टिकून राहिली. मात्र यंदा त्यांच्या पुढे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांची आक्रमक मोहीम असे दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाचे अॅड. अतुल चौगुले दमदार पद्धतीने मैदानात उतरले असून त्यांची उमेदवारी शहरात नवे राजकीय वारे निर्माण करत आहे. तर राष्ट्रवादीकडून जितेंद्र सतानाक बालेकिल्ला टिकवण्यासाठी आक्रमक प्रचार करत आहेत. शिवसेना (शिंदे गट) देखील जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याने यंदाची लढत तुफानी होणार हे स्पष्ट आहे.
श्रीवर्धनमध्ये जनता आता संभ्रमात आहे. “परत तटकरे कुटुंबीयांवर विश्वास ठेवायचा की परिवर्तनाच्या लाटेला पसंती द्यायची?” अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र रंगली आहे. महायुतीचे अंतर्गत तारे अजूनही जुळत नसल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.
यंदाची निवडणूक म्हणजे राजकीय ठिणग्यांची धुरळवणारी लढत ठरणार आहे. गटबाजी, नाराजी, स्वबळाची चुरस आणि बालेकिल्ला टिकवण्याची झुंज—या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जनता कोणत्या बाजूला कल दाखवते हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.
श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूक २०२५ ही इतिहासातील सर्वात महाभिडत ठरण्याची चिन्हे आहेत.