आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार विनोद निकोले यांची भेट

41

आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार विनोद निकोले यांची भेट

उपचार व्यवस्था, सुविधा आणि स्वच्छतेचा घेतला सविस्तर आढावा

भरत पुंजारा
पालघर तालुका प्रतिनिधी
मो.९९२३८२४४०७

आमदार विनोद निकोले यांनी बुधवार, दि.२६ नोव्हेंबर रोजी बिना पूर्वसूचना आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक भेट देत आरोग्यसेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. उपचार घेत असलेल्या रुग्णांची तब्येत, त्यांच्या अडचणी तसेच उपचार व्यवस्थेबद्दल समाधानाविषयी माहिती घेऊन त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. भेटीदरम्यान आमदारांनी आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, औषध साठा, आपत्कालीन सेवांची तयारी आणि उपलब्धता यांची तपासणी केली. रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि सुटसुटीत होण्यासाठी आवश्यक सुधारणांची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.

अलीकडेच आमदार निकोले यांनी केलेल्या पाहणीत शस्त्रक्रिया गृहातील एअर कंडीशन (AC) खराब असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत शस्त्रक्रिया गृहात स्वखर्चाने AC लावून देण्यात आला आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया विभागातील तापमान नियंत्रणाची समस्या पूर्णपणे सुटली आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून PHC परिसरात पाण्याच्या कमतरतेमुळे रुग्ण व कर्मचार्‍यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आमदारांच्या पाठपुराव्यानंतर ही समस्या तातडीने सोडवण्यात आली असून आता पाणीपुरवठा नियमित झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या पाहणीदरम्यान आशागड ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिपेश दौडा, सदस्य गौरव ठाकूर, दिपक मोहिते, ग्रामविकास अधिकारी राहुल पाटील, डॉक्टर पांचाळ तसेच आरोग्य केंद्रातील संपूर्ण वैद्यकीय कर्मचारीवर्ग उपस्थित होता.