साखर पुड्यासाठी जाणाऱ्या वाहनांचा अपघात , मृतकांची संख्या झाली पाच
उपचार घेतांना गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पून्हा २ महिलांचा मृत्यू
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात मौजा करटी येथून मजीतपूरकडे साखरपुड्यासाठी जाणाऱ्या टवेरा प्रवासी वाहनाला चालकाने अचानक ब्रेक लावल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले अन् वाहनाने तीन पलट्या घेत एका वीज खांबाला धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या आणखी दोन महिलांचा २६ डिसेंबरच्या रात्री मृत्यू झाला. मनू कुमारू भोयर वय (६५ वर्षे, रा. करटी), सरस्वता ग्यानिराम उईके वय (७० वर्षे, रा. परसवाडा / अर्जुनी) यांचा उपचार घेतांना गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता पाचवर पोहचली आहे.
दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२:४० वाजता गोंदिया तालुक्यातील दांडेगाव येथील बसस्थानकावर टवेरा गाडी (एमएच ४० ए ४२४३) या वाहनाच्या चालकाने ब्रेक लावल्याने त्या वाहनाने तीन कोलांट्या मारल्या. यात जागेवरच छाया अशोक इनवाते (वय ५८ वर्षे, रा. करटी गोनडीटोला, अनुरता हरिचंद ठाकरे वय (५० वर्षे, रा. करटी) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर देवांश विशाल मुळे (दीड वर्ष रा. करटी) या चिमुकल्याचा उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना रात्री ८:०० वाजता जखमी असलेल्या मनू कुमारू भोयर वय (६५ वर्षे, रा. करटी), सरस्वता ग्यानिराम उईके वय (७० वर्षे, रा. परसवाडा / अर्जुनी) यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात लता शिवचरण बघेले वय (३० वर्षे, रा. करटी) यांच्या तक्रारीवरून वाहन चालकावर गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश बनसोडे करीत आहेत.