दिल्लीतील शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातल्या नंदुरबारच्या शेतकरी महिलेचा मृत्यू .
नवी दिल्ली :- दिल्लीतल्या आंदोलनात महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. सीताबाई रामदास तडवी असं या महिलेचं नाव आहे. 16 जानेवारीपासून दिल्लीतल्या शहाजनपूर सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनात त्या सहभागी होत्या. दिल्लीत पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे 56 वर्षांच्या सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातल्या अंबाबरी गावच्या आहेत. सीताबाई तडवी यांचं पार्थिव दिल्लीहून नंदुरबारला त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
दिल्लीत सध्या रक्त गोठवणारी थंडी पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली गारठली आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीत 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तसेच, हवामान विभागाने येत्या दो-तीन दिवसांपर्यंत अशीच थंडी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोदी सरकारने मंजूर केलेले नवे तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत या मागणीसाठी गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. इतक्या थंडीतही शेतकरी अद्याप आंदोलनावर कायम आहेत. याच दरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या सीताबाई रामदास तडवी यांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे.