गोंडपिपरीतील विविध गावांत पाणीटंचाई
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
देशाला स्वातंत्र्य मिळाले, आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. असे असतानाही देशातील मूलभूत समस्या मात्र आजतागायत जैसे थे असल्याची प्रचीती आजही येते. गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव, हेटी नांदगाव, टोले नांदगाव, या गावातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. ही देशाची आजची अवस्था आहे.
तालुक्यातील सकमुर प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत नळाद्वारे सात गावातील नागरिकांना घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. मात्र सबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षित पणामुळे कधी दूषित पाणी पुरवठा होते. तर कधी कधी पंधरा पंधरा दिवस पाणी बंद असते. अशा वेळेस येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी लगतच्या नाल्यातील पाणी (चुहा) उपसा करुन आणावे लागते आहे. ही पाण्याची गंभीर समस्या उन्हाळ्यातच नही तर बाराही महीने या समस्येला येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकदा सोशल मीडियावर याबाबत अनेक बातम्या प्रकाशित करण्यात आल्या, मात्र प्रशासन देखील यावर उपाय योजना करण्यासाठी समोर येत नसल्याचे चित्र आहे.
*आंदोलनाचा इशारा*
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणे ही गंभीर बाब आहे. या समस्येवर प्रशासनाने वेळीच उपाय योजना करावी, व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचीत बहुजन आघाडीच्या माध्यमातुन जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांनी दिला आहे.
*मूलभूत अधिकाराचे उल्लंघन*
भारतीय राज्यघटना कलम 21- अ मध्ये नमुद मूलभूत अधिकारात पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. असे असताना ही प्रशासनाकडून मात्र या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. एकंदरीत नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केल्या जात आहे. यामुळे सबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघडी कडून केल्या जात आहे.
*वधूपित्याचा लग्नास नकार*
तालुक्यातील नांदगाव, टोले नांदगाव, हेटी नांदगाव, या गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होत नसल्याने येथील युवकांना वधू मिळणे कठिण झाले आहे. सदर गावाचे नाव घेतल्यास वधू पित्याकडून चक्क नकार दिल्या जात असल्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली आहे.
*कोट.*
सकमुर येथील पाणीपुरवठा योजना ही सपशेल अयशस्वी ठरत आहे. सदरील योजनेच्या कंत्राटदारांमुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.त्यामुळे सदरील कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी.
*– शाहीराज अलोने,*
*माजी उपसरपंच, ग्रा.पं. सकमुर,*