सुका जवळा टनावरी, मात्र बाजारपेठांचा अभाव

सुका जवळा टनावरी, मात्र बाजारपेठांचा अभाव

ग्राहक नसल्याने ९०ते१०० रुपयेकिलोने विकण्याची वेळ

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- सुका जवळयावर ताव मारणे खवय्यांना फारच आवडते. परंतु याच सुक्या जवळ्याला बाजारपेठेचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची माहिती समोर आली आहे. शंभर टनहून अधिक जवळा उपलब्ध असताना त्याला बाजारपेठ नसल्याने मच्छिमार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

मार्च महिन्यानंतर जवळ्याचा हंगाम सुरु होतो. तो जवळा सुकवून बाजारात विकण्याचे काम केले जाते. पावसाळ्यात सुक्या जवळ्यावर ताव मारण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे जवळ्याला या कालावधीत प्रचंड मागणी असते. जिल्ह्यात सध्या ओला जवळ्याचा हंगाम आहे. जाळ्यांमध्ये ओला जवळा मोठ्या प्रमाणात येत आहे. लहान बोटीमध्ये अर्धा ते एक टन व मोठ्या बोटींमध्ये तीन ते पाच टन जवळा एका दिवसात मिळत असल्याची माहिती मासेमारी करणार्‍यांनी दिली.
गेल्या पंधरा दिवसांतून ओल्या जवळ्याचा हंगाम वाढला आहे. हा जवळ निवडून सुकवण्याचे काम जोरात सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 100 टनहून अधिक जवळ मिळाला असल्याची माहिती मच्छिमारांकडून देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात जवळा उपलब्ध आहे. परंतु, हा जवळा खरेदीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. व्यापार्‍यांसह इतर खरेदी करणार्‍या ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सुक्या जवळ्याच्या भावामध्ये प्रचंड घट होऊ लागली आहे. दीडशे ते दोनशे रुपये किलोने मिळणारा जवळा 70 ते 90 रुपये किलोने विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे. जवळ्याला अपेक्षित असलेला भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील मच्छिमार व कोळी समाज मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लहान बोटींसह मोठ्या बोटीतून मासेमारी करून आणलेला जवळा विकला जात नाही. त्याला मागणी नसल्याने विक्रेत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

मातीचे ओटे कालबाह्य
मार्च महिन्यानंतर जवळ्याचा हंगाम सुरु होतो. तो जवळा सुकवून बाजारात विकण्याचे काम केले जाते. पूर्वी मुरुम व शेणाने सारवलेले ओटे तयार केले जात होते. हे ओटे तयार करण्यासाठी प्रचंड खर्च येत होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून मातीच्या ओट्यांची जागा आता काँक्रिटने तयार केलेल्या ओट्यांनी घेतली आहे. हे ओटे तयार करण्यासाठी फारसा खर्च लागत नाही. त्यामुळे सिमेंटने तयार केलेल्या ओट्यांना मागणी वाढल्याने मातीचे शेणाने सारवलेले ओटे आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.
पाच हजार महिलांना रोजगार
समुद्रातील ओला जवळा सुकवून, साफ करून तो सुकविण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोळीवाड्यांत दिसून येत आहे. अलिबागसह मुरूड व अन्य ठिकाणी काँक्रिट ओट्यावर जवळा सुकवण्याचे काम केले जात आहे. या कामातून स्थानिक महिलांना रोजगार मिळत आहेत. तीनशे ते चारशे रुपये रोजंदारीवर मेअखेरपर्यंत महिलांना काम मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये रोजंदारीतून मिळत आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी या कामातून महिलांकडून मदतीचा हात मिळत आहे.

जिल्ह्यातील बंदरांवर मोठ्या प्रमाणात जवळा मिळाला आहे. हा जवळा सुकूवून तो बाजारात पाठविण्यासाठी तयार आहे. मात्र, व्यापार्‍यांकडून मागणी नसल्याने त्याला बाजारपेठ नाही. त्यामुळे मच्छिमार मोठ्या संकटात सापडले आहेत. पूर्वी कोकण किनारपट्टीमध्ये या कालावधीत जवळा व्यापार्‍यांकडून विकत घेतला जात होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून याच कालावधीत गुजरातमधील सुक्या जवळाला मागणी आहे. त्यामुळे कोकण विशेषतः रायगड जिल्ह्यातील सुक्या जवळ्याला बाजारपेठ नसल्याची खंत आहे.

विजय गिदी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई

सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न

सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व

आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.