18 वर्षावरील युवकांना साकळी येथे लसीकरण केव्हा? युवावर्गाचा सवाल.
आरोग्य सभापतीं रविंद्र पाटील यांनी लक्ष घालावे; तरुणवर्गामध्ये संतप्त भावना

✒किरण माळी, यावल तालुका प्रतिनिधी✒
साकळी/यावल:- कोरोना महाभयंकर आजाराचा संसर्ग थोपविण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर जोर दिला जात आहे. यात ४५ वर्षा वरील नागरिकांना तसेच फ्रंट वर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर लसीकरण केले जात आहे. मात्र १८ वर्षावरील युवकांना लसीकरण केव्हा केले जाणार ? आरोग्य प्रशासनाला आमच्या जिवाची पर्वा नाही का? असे संतप्त सवाल युवा वर्गातून उपस्थित केला जात आहे वास्तविक युवावर्ग ही देशाची ताकद असून सरसकट युवावर्गास लसीकरण करण्यात यावे अशी मागणी युवा वर्गातून जोर धरत आहे.
कोरोना या जीवघेण्या आजारा सोबतसोबत आता म्युकरमायक्रोसिस या गंभीर आजाराने सुद्धा डोके वर काढायला सुरूवात केलेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः तरूणवर्गामध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तथापि कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून विविध अशा व्यापक उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध अशा सूचना दिल्या जात आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे ४५ वर्षावरील नागरिकांना तसेच समाजातील फ्रंटवर्कर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यापक असे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे निश्चित ही बाब समाज मनासाठी सकारात्मक आहे.
मात्र १८ ते ४५ वर्षा दरम्यानच्या युवा व मध्यमवयीन नागरिकांना ग्रामीण भागातील साकळी येथील लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जात नसून त्यासंदर्भात वरूनच आदेश नसल्याने युवावर्गाला लसीकरण केले जात नसल्याचे संबंधित आरोग्य प्रशासनाकडून वेळोवेळी सांगितले जात आहे. तथापि युवापिढी ही देशाची ताकद असून शिक्षण, नोकरी, व्यवसाय व इतर कामकाजाच्या दृष्टीने तरुण वर्गाचा समाजातील प्रत्येक घटकांशी वारंवार संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात संभवितो. त्यामुळे १८ ते ४५ वर्षा दरम्यान च्या तरुण नागरिकांना लसीकरण करणे फार महत्त्वाचे आहे. अनेक युवक सदर केंद्रावर येतात व त्यांना त्यांच्यासाठी लागणारी कोवॅकक्सिन लस उपलब्ध नसल्याने व लसीकरणाचा आदेश नसल्याने माघारी फिरावे लागते. युवकांना लसीकरण केव्हा केले जाणार? आरोग्य प्रशासनाला आमच्या जिवाची पर्वा नाही का?आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का ? हि महत्वाची बाब आरोग्य प्रशासना व लोकप्रतिनिधींच्याच्या लक्षात येत नाही का ? असे संतप्त सवाल युवा वर्गातून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान जळगाव जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांच्याशी संपर्क साधून, साकळी येथील लसीकरण केंद्रावर तरुणवर्गाला लस का दिली जात नाही याबाबत विचारणा केली असता त्यांनी मी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून सांगतो असे सांगितले. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून रविंद्र पाटील यांनी ही बाब गांभीर्यपूर्वक घेऊन तरुणवर्गाला लवकरात लवकर व्यापक असे लसीकरण कसे करता येईल यावर ठोस पाऊल उचलायला हवे. अशी मागणी तरुण वर्गाकडून केली जात आहे