21 वर्षिय विवाहितेनं सॅनिटायझर पिऊन केली आत्महत्या.

✒प्रा. श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड:- बीड जिल्हातील पाटोदा तालुक्यातील धनगर जवळकामध्ये एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सासरच्या मंडळाकडून सतत सुरु असलेल्या छळाला कंटाळून विवाहित तरूणीनं सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय तरूणीचं नाव पूजा गणेश रायकर आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजाचं लग्न 2 वर्षापूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत झालं होतं. पुजाचं माहेर अंबेजोगाई असून गणेश पुण्यात एका खासगी वाहतूक कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दिड वर्ष चांगले गेले. त्यानंतर मुलबाळ होत नाही यावरून तिचा नवरा गणेश, सासरा शिवाजी आणि सासू विजुबाई हे सतत तिला त्रास देऊ लागले. त्यात कार घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये घेऊन येण्याचा तगादाही लावत होते. पूजानं माहेरी याबाबत सांगितलं होतं. मात्र, पूजाच्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. त्यांच्या आणखी एका मुलीचं लग्न बाकी होतं. त्यामुळे जमले तर पैसे देतो असं पूजाच्या सासरच्यांना सांगितलं होतं.
सततचा छळ असह्य झाल्यानं तिनं 19 मेला दुपारी 3 वाजता वडिलांना शेवटचा फोन केला आणि त्यानंतर ती सॅनिटायझर प्यायली. काही वेळानंतर तिला अत्यावस्थेत अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सहा दिवस उपचार घेऊन पुण्यातील रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा 26 मेला सकाळी 4 वाजता पूजाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
दरम्यान, पूजाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यास तिनं सॅनिटायझर पिल्याचं समोर येईल आणि आपल्यावर हे प्रकरण ओढावेल. त्यामुळं शवविच्छेदन टाळण्यासाठी लॅबमध्ये पुजाची कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचा खोटा लेखी अहवाल तिच्या पतीनं सादर केला. मात्र,पूजाच्या माहेरच्या लोकांना संशय आला त्यांनी दुसरीकडे पुजाची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरच्यांनी चक्क तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट बनवला. माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. पुुुुजाच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील दोघांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.