उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय चाचण्यांचा अभाव; सिटीस्कॅन आणि एम आर आय ची सुविधा नाही
संतोष आमले
पनवेल तालुका /प्रतिनिधी
9220403509
पनवेल उपजिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले असले तरी याठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे. विशेष करून एमआरआय आणि सिटीस्कॅनची सोय नसल्याने रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर सोनोग्राफीसाठी तंत्रज्ञ या ठिकाणी नाही त्यामुळेसुद्धा अडचणी निर्माण होतात. येथे आरोग्य विभागाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पनवेल मध्ये या अगोदर ग्रामीण रुग्णालय होते. महानगरपालिकेच्या पाठीमागील मैदानाच्या बाजूला हे हॉस्पिटल होते. मात्र ते मोडकळीस आल्याने बारा वर्षांपूर्वी कोळी वाड्यामध्ये हे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे फारशा सोयी सुविधा नव्हत्या. माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे यांच्या कार्यकाळात पनवेल नगरपरिषदेने रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर प्रशांत ठाकूर आमदार झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या इमारतीसाठी पाठपुरावा केला. तेव्हाचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आणि सकारात्मक प्रतिसाद देऊन पनवेलला 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. भूमिपूजन होताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचा वाढता विस्तार लक्षात घेऊन येथे शंभर खाटांचे रुग्णालय व्हावे अशी मागणी केली. त्याचबरोबर ट्रॉमा केअर सेंटर किती आवश्यक आहे. हे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पुन्हा सुधारित आराखडा तयार करून त्यासाठी शासनाने तरतूद केली. आणि पाहता पाहता पनवेल ला भव्य दिव्य स्वरूपामध्ये रुग्णालय उभे राहिले. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात आले. या रुग्णालयाला डाॅ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय असे नाव देण्यात आले. या ठिकाणी राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु आजही या ठिकाणी वैद्यकीय चाचण्या होताना दिसत नाहीत. पनवेल उपजिल्हा रुग्णालय मध्ये एम आर आय आणि सिटीस्कॅन ची सुविधा नाही. त्यामुळे अपघात आणि इतर रुग्णांची चाचणी करता येत नाही. त्यांना त्यासाठी खासगी रुग्णालयात किंवा अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागते. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही.आघाडी सरकारच्या कार्यकाळात मध्ये पनवेल येथे उपजिल्हा रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत उभी राहिली. त्यामुळे येथे गोरगरीब गरजू रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. सर्वसामान्यांसाठी हे रुग्णालय खऱ्या अर्थाने संजीवनी ठरत आहे. एकंदरीतच या परिसराची लोकvवस्ती विचारात घेता डॉ नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय चाचण्या करता यंत्रणांची आवश्यकता आहे. या ठिकाणी एम आर आय आणि सिटीस्कॅन करण्याची सोय आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.