बुलडाणा जिल्ह्यात खळबळ तहसीलदाराच्या घरात कोतवालाने केली आत्महत्या.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
बुलडाणा,दि.27 जुन:- बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोताळा तहसीलदाराच्या शासकीय निवासस्थानी कोतवालाने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या कोतवालाचे नाव विष्णू सुरपाटने असून पंख्याला दोरी बांधून गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. सुरपाटने यांनी आत्महत्या का केली याची अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही.
प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील मोताळ्याचे तहसीलदार समाधान सोनावणे यांच्याकडे विष्णू सुरपाटने हे काम करायचे. कोतवाल म्हणून ते तहसीलदार सोनावणे यांच्या अतंर्गत नोकरी करायचे. मात्र, आज 27 जून तहसीलदार सोनावणे हे त्यांच्या शासकीय निवास्थानी नव्हते. ते काही काम असल्यामुळे घराबाहेर पडले होते. याच वेळी कोतवाल विष्णू सुरपाटने यांनी तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानातील एका खोलीमध्ये गळफास घेतला. खोलीमधील पंख्याला दोरी बांधून त्यांनी स्वत:ला संपवलं.
आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यातच दरम्यान, कोतवाल विष्णू सुरपाटने यांनी आत्महत्या का केली ? त्यांच्यावर कार्यालयीन कामाचा दबाव होता का ? की त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा निर्णय घेतला, हे अजूनही गुलदस्त्याच आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नसून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून सत्य लवकरच समोर येईल असे सांगितले जात आहे.