विश्वविजेती दिपिका कुमारी, पॅरिस तीरंदाजी वर्ल्डकप मध्ये जिंकली विक्रमी तीन सुवर्णपदकं

51

विश्वविजेती दिपिका कुमारी

विश्वविजेती दिपिका कुमारी, पॅरिस तीरंदाजी वर्ल्डकप मध्ये जिंकली विक्रमी तीन सुवर्णपदकं

मनोज कांबळे,मुंबई
दि.२९ जून २०२१: लहानपणी आपण सगळ्यांनीच गमंत म्हणून बांबूचा धनुष्यबाण बनवून झाडावरचे आंबे-पेरू पाडण्याचा खेळ खेळला असेल. झारखंड मध्ये जन्मलेल्या दिपिका कुमारीने सुद्धा आपल्या तिरंदाजीला अशीच सुरुवात केली होती. आजच्या घडीला आपल्या मेहनतीच्या जोरावर दीपिका कुमारी जागतिक तिरंदाजी रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर असून नुकत्याच पॅरिस मध्ये झालेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप २०२१ मध्ये तीन पैकी तीन सुवर्ण पदकं जिंकून तिने विश्वविजेतेपदाचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

झारखंड मधल्या रांचीपासून विश्वविजेतेपदापर्यंतचा प्रवास हा काही सोपा नव्हता. दिपिका कुमारीचे वडील शिवनारायण महातो रिक्षाचालक होते तर आई गीता शिवनेरायण महातो रांची मेडिकल हॉस्पिटल मध्ये नर्सच काम करत असे. त्यावेळी तिरंदाजीच प्रशिक्षण घेणाऱ्या आपल्या चुलत बहिण विद्या कुमारीला पाहून दीपिकाला तिरंदाजीची आवड निर्माण झाली. परंतु घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिरंदाजी सारख्या खर्चिक खेळासाठी लागणारी साधनसामुग्री विकत घेणं अवघड असल्याने दिपिका कुमारीला बांबूच्या धनुष्यबाणाने तिरंदाजीच्या सरावास सुरुवात केली. मेहनतीने आपल्यातील अंगभूत टॅलेन्टचा स्तर उंचावून २००६ मध्ये दीपिकाने जमशेदपूर येथील टाटा तिरंदाजी अकॅडमी मध्ये प्रवेश मिळवला. त्यावेळी १२ वर्षाच्या असलेल्या दिपिकाने तिरंदाजीच्या सरावात स्वःतला इतके झोकून दिले की पुढची तीन वर्ष ती घरी गेलीच नाही. अखेर नोव्हेंबर २००९ मध्ये ती घरी परतली ती कॅडेट वर्ल्ड चॅम्पयनशिप जिंकूनच.

दीपिका कुमारीचा स्वभाव “करना है तो करना है” असा जिद्दी असल्याचा तिचा पती अतनू दास आनंदाने सांगतो. अतनू दास हि भारतीय तिरंदाजी खेळाडू असून जून २०२० मध्ये दोघांचा विवाह झाला होता. दीपिका कुमारीच्या ह्याच जिद्दी स्वभावामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आज ती तिरंदाजी खेळाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहचली आहे. दीपिका कुमारीने तिरंदाजी वर्ल्डकप मध्ये आजवर ९ सुवर्ण, १२ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची कमाई केली आहे. तसेच तिने कॉमनवेल्थ गेममध्ये दोन सुवर्ण आणि वर्ल्ड चॅम्पिअनशिप मध्ये दोन रौप्य पदकं जिंकली आहेत. पॅरिस २०२१ तिरंदाजी वर्ल्डकप मध्ये दीपिकाने महिला वैयक्तीत आणि संघ ह्या प्रकारात अनुक्रमे रशिया आणि मेक्सिकोच्या खेळाडूचा पराभव करून सुवर्ण पदक मिळवली. तर मिश्र दुहेरी प्रकारात पती अतनू दासच्या जोडीने नेदरलँडच्या संघाचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकले. भारत सरकारने तिरंदाजी क्रीडा क्षेत्रातील दीपिका कुमारीच्या योगदानाची दखल घेत तिला २०१२ साली अर्जुन पुरस्कार आणि २०१६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं.

तिरंदाजी हा खेळ मुळातच खेळाडूच्या संयमाची आणि एकाग्रतेची परीक्षा पाहणारा असतो. त्यामुळे आजवर मिळालेल्या यशाबद्दल भारावून न जाता दीपिका कुमारी सध्या आपल्या पुढच्या लक्ष्याची तयारी करत आहे. वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच सारी सुवर्ण पदक जिंकल्याचा आनंद होत असला तरी, पुढे येणाऱ्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये परफॉर्मन्स अधिक सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल. तिरंदाजी क्रीडा प्रकारामध्ये भारताने आजवर एकही ऑलिम्पिक पदक जिंकलं नाहिये. त्यामुळे भारतासाठी तीरंदाजी मध्ये ऑलिम्पिक पदक जिकनं माझ्यासाठी फार महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया दीपिका कुमारीने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

रिओ ऑलिम्पिक २०१६ आणि लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये दीपिका कुमारीने भारताचं प्रतिनिधित्व केलं होत. जुलै २४ पासून सुरु होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये दीपिका कुमारी भारताकडून एकमेव महिला तिरंदाज म्हणून सहभागी होत आहे. सध्या आपल्या क्रीडा कौशल्याच्या शिखरावर असलेली दीपिका कुमारी भारताला तिरंदाजी क्षेत्रातील ऐतिहासिक असं पाहिलं पदक नक्कीच मिळवून देईल अशी साऱ्या भारतीय क्रीडा प्रेमींची आशा आहे.