रायगड जिल्हयात साडेतीन वर्षात डेंग्यूचे 458 रुग्ण
6 जणांचा मृत्यू, जिल्हयात डेंग्यूचा उद्रेक सुरूच, अलिबाग, उरण, पेण येथे रुग्ण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्हयात डेंग्यूचा उद्रेक सुरूच आहे. सध्या जून महिन्यातील पावसाळ्याचा हंगाम सुरु आहे. अलिबाग तालुक्यातील वाघ्रण, कावाडे, सारळ, उरण तालुक्यातील कोप्रोली, खोपटे येथे डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहेत. तर पेण तालुक्यातील जिते येथेही डेंग्यूच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे जिल्हयाचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर काम करीत आहे. रायगड जिल्हयात गेल्या साडेतीन वर्षात डेंग्यूचे 458 रुग्ण आढळून आले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
डेंग्यू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे जो संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्येचे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. एडिस इजिप्ती या मादीच्या चाव्याव्दारे पसरतो. डासाचा दंश झाल्यावर तीन ते चाैदा दिवसांनी संक्रमित व्यक्तीला लक्षणे दिसतात. सांधे किंवा स्नायू दुखणे, डोकेदुखी, मळमळ, सुजलेल्या ग्रंथी, उलट्या होणे, पुरळ उठणे ही काही सामान्य लक्षणे आहेत. काही प्रकरणांमध्ये बाधित व्यक्तीच्या अवयवांवरही परिणाम होऊ शकताे आणि हा आजार जीवघेणा ठरण्याची शक्यता असते. मात्र वेळेत योग्य उपचार झाल्यास संक्रमित व्यक्ती आठवड्यातही बरी होते.
रायगड जिल्हयात डेंग्य तापाच्या कुठेना कुठे उद्रेक सुरूच आहे. विशेष करुन शहरी भागात, जेथे इमारती बांधकाम, मजुरांचे स्थलांतर सुरु असते तेथे अशा आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. रायगड जिल्ह्यात सन 2021 मध्ये 29, सन 2022 मध्ये 35, सन 2023 मध्ये 287 आणि जानेवारी 2024 ते 10 जून 2024 पर्यंत 107 असे एकूण 458 डेंग्युचे बाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा हिवताप विभागाचे आरोग्य सहाय्यक राजाराम कांबळे यांनी दिली.
नुकताच अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथे एका 51 वर्षीय महिलेचा डेंग्यु सदृष्य तापाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील कावाडे आणि सारळ या भागातही डेंग्युचे रुग्ण सध्या आढळून आले आहेत. तसेच उरण तालुक्यातील कोप्रोली आणि खोपटे येथे डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहेत. पेण तालुक्यात जिते येथे डेंग्यच्या तापाचा उद्रेक झाला होता. आता तेथील साथ नियंत्रणात असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. राजाराम भोसले यांनी सांगितले. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे डेंग्युचे रुग्ण असल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी आपण 26 जूनला भेट देऊन पहाणी केली आहे. येथे व्हायरल तापाचे रुग्ण असून डेंग्युचे रुग्ण नसल्याचे डाॅ. भोसले यांनी सांगितले.
कोट-
डेंग्युचे डास हे स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळे डेंग्यला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. पाणी साठवून ठेवू नये. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. ताप आल्यास एलायझा तपासणी करुन घ्यावी. यातून डेंग्यूचे निदान होत असते. शासकीय रुग्णालयांमध्ये ही तपासणी मोफत आहे.
-डाॅ. राजाराम भोसले, जिल्हा हिवताप अधिकारी, रायगड
चाैकट-
गेल्या साडेतीन वर्षातील डेंग्यू रुग्ण
सन 2021 – 29 (मृत्यू- 0)
सन 2022 – 35 (मृत्यू- 1)
सन 2023 – 287 (मृत्यू- 5)
सन 2024 – 107 (10 जूनपर्यंत)
चाैकट-
पेण, अलिबाग, उरणमध्ये उद्रेक
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथे एका महिलेचा डेंग्यु सदृष्य तापाने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कावाडे आणि सारळ या भागातही डेंग्युचे रुग्ण सध्या आढळून आले आहेत. तेथे डेंग्यूचा उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. तर उरण तालुक्यातील कोप्रोली आणि खोपटे येथे डेंग्युचे रुग्ण आढळून आले आहेत, येथेही डेंग्यूचा उद्रेक आहे. या ठिकाणी आपण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेटी देऊन पहाणी केली आहे. दोनही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पेण तालुक्यात जिते येथे डेंग्यच्या तापाचा उद्रेक होता मात्र तेथील साथ आता आटोक्यात आहे, असे जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. राजाराम भोसले यांनी सांगितले.
चाैकट-
डेंग्यू निश्चित करण्यासाठी कमिटी
एखाद्या रुग्णाचा डेंग्यूचा संशयित रुग्ण म्हणून मृत्यू झाल्यास त्या्च्या मृत्यूच्या कारणांची चाैकशी करण्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे. यात आरोग्य सहाय्यक संचालक, उपसंचालक, आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी अशा सात अधिकाऱ्यांचा समावेश असतो. कमिटीच्या बैठकीत ज्या-ज्या आरोग्य यंत्रणांनी संबंधित डेंग्यू संशयित रुग्णावर उपचार केलेले असतात, त्यांचे जबाब घेतले जातात. रुग्णाला ताप आल्यापासून ते शवविच्छेदनपर्यंतची माहिती घेऊन संशयित रुग्ण हा डेंग्यूमुळे मृत झाला आहे की अन्य कारणाने हे निश्चित केले जाते.