चंद्रपुरातील प्रदूषण अंशतः खरे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नावर दिले उत्तर

अश्विन गोडबोले 

चंद्रपूर ब्युरो चीफ

 📱 8830857351

चंद्रपूर, 28 जुलै:चंद्रपूर शहर व लगतच्या परिसरात अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, चंद्रपुरातील प्रदूषण हे अंशतः खरे असल्याचे म्हटले आहे.

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. या उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख सर्वदूर झाली. मात्र, आता हेच उद्योग येथील नागरिकांच्या जिवावर उठल्याचे चित्र बघायला मिळत आहे. प्रदूषणाने येथील नागरिकांना श्वसन, दमा, ॲलर्जी व अन्य आजारांचा सामना करावा लागत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सोबतच उद्याेगांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. 

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, चंद्रपूर शहर व परिसरात असलेल्या उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून, नागरिक त्रस्त असल्याची बाब अंशतः खरे असल्याचे म्हटले आहे. तर, दुसरीकडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार मागील तीन वर्षांत दमा, श्वसनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्‍याचे म्‍हटले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उद्योगांची नियमित पाहणी केली जाते. त्रुटी असलेल्या उद्योगांवर कायदेशीर कारवाई केली जाते. प्रदूषण कमी करण्यासाठी चंद्रपूर शहर कृती आराखड्यानुसार कार्यवाही केली जात असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here