नागपंचमी आणि नाभिक समाज जाणुन घ्या, का बंद का असतो या दिवशी ‘सलून’ व्यवसाय….??
श्रावण महिना म्हणजे सणांचा पवित्र महिना,आणि या पवित्र महिन्यातील पहिलाच सण म्हणजे नागपंचमी.
आपल्या कुटुंबाची सदैव नागाच्या भयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी व नागदेवतेचा कृपाशीर्वाद कुटुंबातील सर्वाना प्राप्त व्हावा यासाठी प्रतीवर्षी श्रावण शुक्ल पक्षातील पंचमीला म्हणजेच नागपंचमीला महाराष्ट्रात नागदेवतेचे घरोघरी पुजन केले जाते.यावर्षी नागपंचमीचा सण उद्या म्हणजेच मंगळवारी २९ जुलै रोजी सर्वत्र साजरा होत आहे.
या पवित्र दिवशी प्रत्येक घरातील स्रिया नवीन वस्त्र, अलंकार परिधान करुन मनोभावे नाग देवतेची पुजा करतात.घरामध्ये नागाची प्रतिमा अथवा जिवती लाऊन पूर्ण महिनाभर पुजा अर्चना केली जाते.
नागपंचमीचा सण हा विशेष करुन स्त्रियांचा सण.
पुराणातील विविध प्रचलित कथांनुसार हा सण राज्यभर विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. परंतु या सणाचा मुख्य उद्देश मात्र एकच असतो, आणि तो म्हणजे नाग भयापासून मुक्तता आणि नागाचे आणि त्यांच्या प्रजातीचे संवर्धन. खरे तर नागदेवता ही इच्छेशी संबंधित देवता आहे, तो इच्छेचा प्रवर्तक आहे. इच्छेचा प्रवर्तक म्हणजेच इच्छेला गती देणारा किंवा सकाम इच्छेची पूर्तता करणारा.
नागपंचमीच्या दिवशी नागदेवताजन्य तत्त्वाच्या इच्छालहरी भूमीवर अवतरलेल्या असल्याने वायूमंडलात नागदेवताजन्य तत्त्वाचे प्रमाण जास्त असते. म्हणुनच या दिवशी कापणे, चिरणे आणि तळणे, या कृतींमधून रज-तमाशी संबंधित इच्छालहरी निर्माण होतात. या स्पंदनांचा व्यक्तीवर परिणाम होतो, तसेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध होतो. यामुळे नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते अशी धारणा आहे. आणि केवळ याच भावनेतून नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे, या कृती निषिद्ध मानल्या आहेत.
या दिवशी बहुतांश भागात घरातील महिला काही तळत, कापत अथवा भाजत नाहीत.यामागे दुसरा मुख्य हेतु देखील असतो की,घरातील गृहिणीला किमान या निमित्ताने एक दिवस तरी आराम मिळावा, आणि अनवधानाने नागाला काही इजा होऊ नये म्हणून शेतकरी देखील आपली शेतातील सर्व कामे बंद ठेवतात.
थोडक्यात सांगायचे झालेच तर आज एकवीसव्या शतकात देखील राज्यभर हा सण आनंदाने,भक्तीभावाने आणि मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा होतो.
आपल्या राज्यातील नाभिक समाजासाठी मात्र या सणाचे वेगळेच असे आणण्यसाधारण महत्व आहे. म्हणुनच तर राज्यातील तमाम नाभिक बांधव समाजाचे आराध्य दैवत संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथी प्रमाणे नागपंचमी हा सण देखील मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात साजरा करतात.

नाभिक पुराण या अतिप्राचीन ग्रंथानुसार नाभिक म्हणजेच शेषनाग…
न्हावी हाच शेषनागाचा अवतार. या ग्रंथातील कथेनुसार नाभिकाची उत्पत्ती म्हणजे न्हाव्याची उत्पत्ती ही भगवान शंकराच्या नाभीतून म्हणजे बेंबीतून झाली आहे. या कथेनुसार सृष्टीची निर्मिती झाली तेंव्हा पृथ्वीवर महाप्रलय होता.सर्वत्र पाणीचपाणी आणि अंधार पसरलेला होता.तेंव्हा भगवान शंकराने आपला तिसरा डोळा उघडून हा प्रलय थांबवला होता.
यानंतर त्यांनी पृथ्वीवर पर्वत, सागर आणि नाद्यांची निर्मिती केली, तर आकाशात चंद्र, सूर्य, तारे आणि नक्षत्रांची स्थापना केली.भगवान शंकराच्या कृपेने विष्णुच्या नाभीतून ब्राम्हणाची उत्पत्ती झाली.तो ब्राम्हण चतुर्मुख होता.त्याच ब्राम्हणाला भगवान शंकराने सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले.तेंव्हा भगवान विष्णुने शंकराला सांगितले की,ब्राम्हणाचे मुंज बंधन झाल्याशिवाय त्यास ब्राम्हणत्व प्राप्त होणार नाही. आणि यासाठी जाणवे व शिखाची गरज होती.
त्यावेळी शिखाचे कार्य कुणी करावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.शिखा प्राप्त होण्यासाठी नाभिकाची निर्मिती आवश्यक होती.तेंव्हा भगवान शंकराने आपल्या कंठातील शेषाला स्वतःच्या नाभीकमलातून जन्म घेण्यास सांगितले.सुरुवातीला शेषाने भगवंतापासून दुर व्हावे लागेल म्हणुन विरोध केला, आणि भगवान शंकराला विचारले की,या जन्मानंतर मला कशाची प्राप्ती होईल?
यावर भगवान शंकर उत्तरले, तुला सर्व कामात मोठा मान सन्मान प्राप्त होईल. तुझ्याशिवाय ब्राम्हणाला देखील ब्राम्हणत्व प्राप्त होणार नाही.तु सर्वांचाच आवडता होशील व श्रावण महिन्यातील नागपंचमीला तुझे घराघरात पूजन होईल.स्त्रियांचा तु भाऊ असशील आणि तुझ्या वंशात उत्पन्न झालेल्या सर्वांनाच मान सन्मान मिळेल.
भगवान शंकर आणि विष्णुच्या विनंती नुसार अखेर शेषाने भगवान शंकराच्या नाभीतून पृथ्वीतलावर मनुष्य रूपात जन्म घेतला.नाभीच्या कुंडलीणीतून जन्म घेतल्यामुळे त्याचे गोत्र कौडील्य झाले, आणि शेषाचाच अवतार असलेल्या भगवान शंकराच्या नाभीतून जन्म घेतल्यामुळे शेषनागास मनुष्य अवतारात ‘नाभिक’ हे नाव प्राप्त झाले.आणि म्हणुनच शेष नागाला नाभिकांचा वंशज म्हणतात.
अशा प्रकारे नाभिकाचा जन्म तर झाला पण त्याला ब्रम्ह देवाची मुंज करण्यासाठी क्षुरा म्हणजे हत्याराची गरज होती.तेंव्हा स्वतः भगवान शंकराने आपल्या अंतकरणातील पाचव्या सूक्ष्म वेदाला पाचरण करून तात्काळ मंत्ररूप क्षुरा निर्माण केला, आणि हेच झाले नाभिकाचे हत्यार….
याच हत्याराच्या सहाय्याने नाभिकाने ब्रम्हदेवाची शेंडी राखली आणि ब्रम्हदेवाचे मौजीबंधन विधिवत संपन्न झाले.
अशारीतीने ‘नाभिक पुराण’ या ग्रंथानुसार शेषणाग हा तमाम नाभिक समाजाचा पूर्वज ठरतो.आणि या नागराजाचा नागपंचमी हा सण राज्यातीलच नव्हे तर देशभरातील तमाम नाभिक समाज बांधव आणि सलून व्यवसायिक या सणाला एक पवित्र आणि महत्वाचा सण म्हणून साजरा करतात.
या दिवशी आपल्या पुर्वजाचा यथा योग्य आदर आणि भक्तीभाव समर्पित करण्यासाठी नाभिक समाज आपला पारंपरिक सलून व्यवसाय आणि दैनंदिन व्यवहार देखील बंद ठेवतात.नागराज तथा नाग नरसोबाच्या प्रतिमेची मनोभावे पुजा अर्चना करुन त्याच्यापुढे नतमस्तक होतात.
या दिवशी नागराजाला दूध, लाह्या यांचा नैवद्य अर्पण करुन अपल्या पूर्वजाचे मनोभावे स्मरण केले जाते आणि एकमेकाला शुभेच्छा देत भक्तिमय वातावरणात आंदोत्सव साजरा केला जातो.
राज्यातील तमाम नाभिक बांधवाना
नागपंचमी सणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा…
🤝आमची अस्मिता,आमचा स्वाभिमान🤝
लेखक – संजय पंडित, पत्रकार









