
मनोज कांबळे
मुंबई दि. २८ ऑगस्ट २०२१: नव्याने जाहीर झालेल्या शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आज हरियाणा पोलिसांनी लाठीचार्ज केला. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची कर्नाल येथे सभा होती. त्यांच्या विरोधात शेतकरी बस्तारा टोल नाक्यावर शांतिपूर्वक मार्गाने आंदोलन करत होते. परंतु पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आता तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
त्यातच सोशल मीडियावर कर्नालचे सब-डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांचा पोलिसांना आदेश देतानाच एक विडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते पोलिसांना आंदोलकांवर बेछूट हल्ला करण्याचे आदेश देत असल्याचे दिसत आहेत. त्याची तारीख वादातीत असली तरी शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचा आदेश देणाऱ्या विडिओमुळे देशभरातून हरियाणा पोलीस आणि हरियाणा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
आंदोलन करताना शेतकऱ्यांनी मीटिंग साठी जमलेल्या भाजपच्या नेत्यांना काळे झेंडे दाखवले होते तसेच त्यांच्या वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांवर झालेल्या या हल्याविरोधात हरयाणातील विविध भागातील शेतकऱ्यांनी जागोजागी रस्ता रोको आंदोलन कार्याला सुरुवात केली आहे. जोपर्यंत हरियाणा सरकारचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या एकूण घेत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको चालू ठेवण्याचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे हरियाणातील अनेक हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने हरियाणा पोलिसांच्या लाठीचार्जवर टीका केली आहे.