निरंकारी संतसमागम: माणूस घडविण्याचा कारखाना…!

सातत्याने आपल्या आयुष्याबाबत नाराज, अपराधी, असमाधानी आणि अतृप्त राहून इतरांची सहानुभूती मिळवून आणि प्रत्येकाला दोष देऊन, इतरांना चुकीचे दाखवून जगण्यापेक्षा स्वतःसाठी स्वतः पुढाकार घ्या. आपल्या चुका शोधा, आपल्या चुका सुधरविण्यासाठी काम करा आणि पुढे चला. तुम्ही एखाद्यावर रागावून बसलात त्याला फरक पडत नाही, तुम्ही एखाद्याबद्दल मनात अढी ठेवली त्याला थांगपत्ता पण नाही, तुम्ही चिडलात, तुम्ही वैतागलात, तुम्ही खचलात त्याच्या गावी पण नाही! तुम्ही त्याला किती शिव्या शाप दिलेत त्याला माहिती पण नाही!! मग अशावेळी निश्चितच स्वत:मध्ये बदल घडवून आणणे हा एकमेव उपाय शिल्लक राहतो. त्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज असते. या आत्मपरीक्षणाची संधी वार्षिक निरंकारी संत समागमाच्या रूपाने चालून येत असते. याविषयी संत चरण रज- श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी यांच्या या लेखातून जाणून घ्या… 

निरंकारी संतसमागम साऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यात आपली प्रचंड छाप उमटवत आहे. ही माझ्या सांप्रत सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांची अस्सीम कृपादृष्टी आहे. समागमाचे डोळ्यात भरणारे स्वर्गमयी दृष्ये हे संत निरंकारी मिशनच्या सेवादलाचे जवान, सेवाभावी सेवादार भगिनी आणि सेवाभावी संपूर्ण साधसंगत यांच्या त्याग, निष्काम अथक परिश्रम आणि निरंतर प्रयत्नांचे फलित आहे. म्हणूनच निरंकारी बाबा युगदृष्टा सद्गुरू हरदेवसिंहजी महाराज आपल्या अमृततुल्य प्रवचनात गौरवोद्गार काढत असत, “साध संगत ही मेरे सर का ताज है!” संत समागमामध्ये शिकण्यासारखे बरेच काही प्रसंग आणि गोष्टींचे दर्शन होत असते. त्यात प्रेम, दया, आपुलकी, सहनशीलता, समर्पण, सहकार्य, सचोटी, आदर-सत्कार, नम्रता, सेवाभाव आदी अर्थात मानवतावादी दैवी गुणांची सर्वत्र पखरण व उधळणही दिसून येते. किंबहुना हे सर्व दैवी गुण असे कोठूनच एकत्रितरीत्या मिळविता येत नाहीत. हे सगळे पाहून आपल्यात काहीतरी नक्कीच कमतरता असल्याची भावना उचंबळून येते. आपल्यात नेमकी काय काय? कशी कशी? कोणती कोणती? आणि कुठे कुठे? कसर आहे, याची चाचपणी आपल्यात करून ती यथाशीघ्र सुधारण्याची येथे सुवर्णसंधीच मिळते. या समागमाद्वारे संत सज्जनांना एकप्रकारे समदृष्टीच लाभते-

        “सम करके जो देख रही है वो दृष्टि है सन्तो की|

पूरब पश्चिम उत्तर दक्षिण कुल सृष्टि है सन्तो की|

समदृष्टि से सदा विचरते ज्ञानीजन संसार में|

कहे ‘हरदेव’ कि प्यार बढ़ाने लग जाते उपकार में|”

(पवित्र सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र. १७१)

         संत समागमातील नियमांचे व सेवादार बंधुभगिनींच्या सूचनांचे उल्लंघन, अधाशी- हपापलेपणा, स्वार्थ, अरेरावी, उर्मट शब्दप्रयोग, अहंकार आदींना वेळीच तिलांजली देऊन कायम परोपकार व मानसन्मान राखण्याची सवय आत्मसात करणे भाग पडते. समागमातील सेवाकार्य जसे- पार्किंग, स्वागत, तपासणी, सत्संग रांग, नमस्कार रांग, चप्पल सेवा, लंगर रांग, भोजन पंगत, सवयंपाक सेवा, खोयापाया, दिव्यांग सेवा, कॅन्टिन, प्याऊ, स्वास्थ्य सेवा, शौचालय व मुत्रीघर, रहिवासी तंबू, स्वच्छता- सफाई, आदीतील सेवादरांचे समर्पण, निष्काम व निरीच्छीत भाव प्रत्येकास आकर्षित करीत असतात. येथील हे सुंदर, मनमोहक स्वर्गाहून सुखद वातावरण बघून बरेच काही शिकावयास मिळते. हे एवढे आल्हाददायक कसे काय शक्य झाले? माझ्या घरीदारी व अवतीभवती असेच स्वर्गमय वातावरण तयार होईल का? वा करता येईल का? आपल्या मनात असेही भाव- प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. त्यानंतर आत्मपरीक्षण करणे सहज सुलभ होऊ शकते. म्हणून संतांनी समागमाची महती वर्णिली आहे. गोस्वामी संत तुलसीदासजी महाराजांनी रामचरित मानसमध्ये सांगितले-

           “सुत दारा और लक्ष्मी पापी के भी होय|

            संत समागम हरिकथा तुलसी दुर्लभ दोय||”

         आत्मपरीक्षण म्हणजे काय? आपण सगळेच हा शब्द दैनंदिन जीवनात अनेकदा वापरतो. आपण खूपदा इतरांना सल्ले देताना, इतरांना समजावताना, अथवा कोणाशीही भांडण, मतभेद, वादविवाद झाल्यावरसुद्धा त्याला “तू आत्मपरीक्षण कर…!” असा सहजासहजी सल्ला देऊन टाकतो. दुसर्‍याला आत्मपरीक्षण करायला सांगणे खरं तर खूप सोपे असते, परंतु आपण स्वतः कितीवेळा किती गांभीर्याने आपल्या स्वतःसाठी आत्मपरीक्षण केलेले आहे? यावर विचार करणे आवश्यक आहे. आपण सगळेच आजपर्यंतच्या आपल्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटना, प्रसंग, प्रगती, अधोगती, यश, अपयश, नफा नुकसान, फायदा यासाठी कोणाला न कोणाला जबाबदार धरत असतो. शक्यतो आपल्या जीवनात घडलेल्या अथवा घडणार्‍या चुका, अनपेक्षित अथवा अप्रिय घटना यांत आपण इतरांना दोष देण्यात धन्यता मानतो. आपल्याला दोष देण्यासाठी आपल्या कुटुंबातले, आपल्या नात्यातील, अगदी आपल्या मागील पिढीतील जेष्ठ सदस्य, आपल्या मित्र परिवारातले, आपल्या संपर्कातले, आपले सहकारी कोणीही चालते. दोषच द्यायचाय तर तो आपल्या नशिबापासून ते देवापर्यंत सगळ्यांना देऊन आपण मोकळे होतो. समागमातील मनावर घेण्यासारखे दृश्य- म्हातारे व दिव्यांगाची मदत, गरजूंना प्राधान्य, स्वतःची तहानभूक बाजूला सारून इतरांना भरविणे, आपले दुखण-खुपणे साहून दुसर्‍याची शुषृशा करणे, पोटभर जेवू वाढणे, हे बघून आपण आपल्यातील उणीवा, दोष आणि कमतरता हेरून त्यांवर आपणच उपायही योजू शकतो. अपयशाचे, नुकसानीचे, मान हानीचे खापर इतरांवर फोडणे, दुसर्‍यांना जबाबदार धरणे, हा असा वागला, तो तिथे चुकला, तो बदलला, त्याने दगा दिला, याने धोका दिला, त्यानं फसवलं, त्यानं विश्वासघात केला, तोच चुकला, हे म्हणणं खूप सोपं आहे. आपण कुठे आहोत? आपण काय करतोय? आपण कसे वागलो आहोत? आपल्यामुळेच आपल्या स्वतःच्या वागणुकी अथवा निर्णयामुळे आपल्या आयुष्यात काही चुकलं काय? आपणच काही वादळ आपल्या आयुष्यात निर्माण केलीत का? आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे माणसं दुखावलीत, दुरावलीत का? नेमक कुठे बिनसलं? आपल्या अती राग, अती घाई किंवा अती भावनांशील स्वभावामुळे आपण आज एकटे पडलोय का? अडचणीत सापडलोय का? यावर स्वतःचीच चाचपणी करणे म्हणजे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. जग सुखराशीने केव्हा भरेल? हे सत्यसम्राट संतश्रेष्ठ हरदेवसिंहजी महाराज समजावतात-

       “आत्म भाव से देख रहा जो उसको सबसे प्यार है|

उसके लिये तो सारी दुनिया अपना ही परिवार है|

नफ़रत खुद ही मिट जायेगी प्यार अगर बढ़ जायेगा|

कहे ‘हरदेव’ गुरू ज्ञान से दुनिया में सुख आयेगा|”

(पवित्र सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र. १३१)

      आपण वर्तमानकाळात आज जे काही आहोत, ज्या काही परिस्थितीमध्ये आहोत त्यात आपलेच स्वतःचे भूतकाळात घेतलेले चांगले वाईट निर्णय, आपलीच विचारधारा, आपलाच स्वभाव, आपलीच वागणूक कारणीभूत ठरलेली असते. इतरांना आपल्या सुख दुःखाला जबाबदार धरून कुढत रडत बसण्यापेक्षा, इतरांनी आपल्या मनाप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे वागावे याची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करणे हिताचे राहील असे वाटते. आजच्या अतिशय व्यावहारिक जगात कोणीही तुम्हाला आधार द्यायला येईल, याची वाट पाहत बसणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. आपण समोरच्याला कधीच बदलू शकत नाही आणि तसा प्रयत्न करणेही व्यर्थ आहे. कोणीही आपल्यासाठी बदलणार नाही हे सत्य स्वीकारून आपला स्वभाव, आपलीच वागणूक, आपली वैचारिकता, मानसिकता, दृष्टीकोन बदलणे रास्त राहील असे वाटते. आपली वाट, आपले धोरण आपला मार्ग सुयोग्य असेल तर कोणालाच तुम्हाला त्रास देण्याचा अधिकार राहत नाही.

       समोरच्यावर आपल्या अपेक्षांचं ओझं लादून त्याचं मत आणि मन परिवर्तन करण्यात आयुष्यातील बहुमोल वेळ, श्रम आणि बौद्धिक भावनिक ऊर्जा वाया घालविण्यापेक्षा स्वतःवर काम करणे, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणे यासाठी वेळ देणे क्रमप्राप्त आहे. आपण जी मेहनत इतरांच्या मागे लागण्यात, इतरांच्या नादी लागण्यात, इतरांना आपली बाजू पटवून देण्यात घेतो तीच मेहनत स्वतःला सक्षम करण्यात, स्वतःला खंबीर करण्यात घेतली तर आपलं आयुष्य घडवायला इतरांच्या हातभाराची गरज पडणार नाही. दुसर्‍यावर, दुसर्‍याच्या वागणुकीवर, दुसर्‍याचे मूड, त्याच्या आयुष्यातील चढउतार यावर, दुसर्‍याच्या दैनंदिन आयुष्यावर आपले आयुष्य, आपली मानसिकता अवलंबून ठेवण्यापेक्षा, त्याच्याअनुरूप स्वतःच चांगलं वाईट घडवून घेण्यापेक्षा, त्याच्या अधिपत्याखाली आपला भावनिक तोल सांभाळत जगण्यापेक्षा स्वतःवर काम करा. आपण जेंव्हा दुसर्‍यावर आर्थिक, भावनिक, मानसिक, शारीरिक कोणत्याही कारणास्तव अवलंबून राहायला लागतो तेव्हा आपल्या विकासाच्या मर्यादा आपणच संकुचित करुन घेत असतो. त्याहीपलीकडे ज्यासाठी दुसर्‍यावर अवलंबून राहिलो, तो अपेक्षित वागला नाही की त्याला दोष देऊन मोकळे होतो. वास्तविक त्याला जे योग्य वाटतंय, त्याच्या सोईच जे आहे त्यानुसारच तो वागतोय. तो आपली जी किंमत करतोय, त्याच्या आयुष्यात आपल्याला जितकं महत्व आहे त्यानुसार वागणूक आपल्याला मिळते आहे हे पचवणं आपल्याला जड जातं आणि आपण त्रागा करीत बसतो. आपला अहंकार दुखावला जातो, आपल्या आत्मसन्मानाला ठेच लागते म्हणून आपण समोरच्याला कुठंवर दोष द्यायचा? आपला मान अपमान सन्मान इतका पण स्वस्त होऊ देऊ नये अन्यथा कोणीही त्यावर आघात करेल. संताचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. जगद्गुरू संतशिरोमणी तुकारामजी महाराजांनी सांगितले-

          “संत समागमी धरावी आवडी!

          करावी तातडी परमार्थाची!!”

           सातत्याने आपल्या आयुष्याबाबत नाराज, अपराधी, असमाधानी आणि अतृप्त राहून इतरांची सहानुभूती मिळवून आणि प्रत्येकाला दोष देऊन, इतरांना चुकीचे दाखवून जगण्यापेक्षा स्वतःसाठी स्वतः पुढाकार घ्या. आपल्या चुका शोधा, आपल्या चुका सुधरविण्यासाठी काम करा आणि पुढे चला. तुम्ही एखाद्यावर रागावून बसलात त्याला फरक पडत नाही, तुम्ही एखाद्याबद्दल मनात अढी ठेवली त्याला थांगपत्ता पण नाही, तुम्ही चिडलात, तुम्ही वैतागलात, तुम्ही खचलात त्याच्या गावी पण नाही! तुम्ही त्याला किती शिव्या शाप दिलेत त्याला माहिती पण नाही!! मग अशावेळी निश्चितच स्वत:मध्ये बदल घडवून आणणे हा एकमेव उपाय शिल्लक राहतो. त्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज असते.

        सतत इतरांना जबाबदार धरून आपलं आयुष्य दयनीय करुन घेण्यात, पश्चाताप आणि मनस्ताप करुन घेण्यात व्यर्थ वेळ घालविण्यापेक्षा स्वतःवर काम करायला सुरुवात करा. तुम्ही कोणामुळे किती दुःखी झाला आहात, कोणाच्या वागण्याने दुखावले गेले आहात, कोणासाठी थांबलेले आहात, कोणाची वाट बघत आहात याचेशी कोणालाही काहीही घेणंदेणं नसतं. जो तो आपलं आयुष्य मजेत आणि मर्जीने जगण्यात व्यस्त असतो. प्रत्येकाला त्याचं आयुष्य प्रिय असतं, त्याचं स्वतःचं विश्व प्रिय असतं. आपण कुणासाठी तापदायक, त्रासदायक व्हायला लागलो की ते आपल्याला आपली पायरी दाखवतात, अपमानित करतात. त्यामुळे आपल्याला सुखानं जगायचं असेल आणि दर्जेदार जीवन जगायचं असेल तर कोणाच्याही कोणत्याही वागणुकीचा आपल्या जीवनावर परिणाम न होऊ देणे, सातत्याने स्वतःचे मूड, मानसिकता, भावनिकता बिघडू न देणे अत्यंत महत्वाचे आहे. हे जर साध्य करायचे असेल तर, स्वतःच्या स्वभावावर स्वतःच्या वागणुकीवर स्वतःच्या मनावर आणि स्वतःच्या विचारसरणीवर काम करणे अपेक्षित आहे. गुरुकृपेने प्रभूप्राप्ती आणि सुखी जीवनाचे रहस्य शहंशाह अवतारसिंहजी महाराजांनी सांगितले-

          “नीच निमाणा गुण नहीं पल्ले आपे तरस तूं कीता ए|

तेरी रहमत दे सदके मैं जीवन दा रस लीता ए|

मुरशद मेरे रहमत कीती चरनां दे नाल लाया ए|

रमया राम अवतार गुरू ने छिन दे विच विखाया ए|”

[पवित्र सम्पूर्ण अवतार बाणी: पद क्र. २७१]

         आपल्या मनस्थितीला, आपल्या परिस्थितीला आपण स्वतः कारणीभूत आहोत हे अगोदर मोठ्या मनाने स्वीकारता आलं पाहिजे. ज्यावेळी आपण आपली सत्य परिस्थिती स्वीकारू आणि त्याची जबाबदारीदेखील स्वतः घेऊ तेव्हा जगणं सोपं होण्यास मदत होईल. स्वतःचे ध्येय स्पष्ट ठेवणे, त्याच दिशेने योग्य मार्गांवरून वाटचाल करणे, आपल्याकडून कोणालाही न दुखावणे, कोणाच्याही त्रासाला कारणीभूत न होणे, कोणत्याही चुकीच्या व्यक्ती अथवा परिस्थितीमध्ये आपली भावनिक मानसिक तसेच आर्थिक गुंतवणूक पूर्ण विचार केल्याशिवाय न करणे, प्रत्येक नातेसंबंध दर्जेदार पद्धतीने हाताळण्याचा निदान आपल्याकडून प्रयत्न होणे हे काही पायाभूत तत्व अंगीकारून आपलं आयुष्य आपण तणाव मुक्त करू शकतो. आपल्याला कुठे बदलणे आवश्यक आहे, काय बदलणे गरजेचे आहे यावर अभ्यास करून स्वतःचं असं अंतर्मनात स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि स्वतःभोवती असं वलयं तयार करणं आवश्यक आहे. जिथे कोणीही, कोणाचीही वागणूक, कोणाचाही स्वभाव तुम्हाला विचलित करू शकणार नाही. सगळ्यांमध्ये राहून देखील अलिप्त राहणं, शांत राहणं, संयमी राहणं हे आव्हान जो पेलू शकतो; तो स्वतःला नक्कीच बदलू शकतो. निरंकारी संत समागम ही माणसाला माणूस बनण्यास लाभलेली एक सर्वोत्तम संधी आहे. एवढेच नव्हे, तर हे समागम म्हणजे सद्गुरूने उघडलेला माणूस घडविण्याचा कारखानाच आहे, हे नक्की!

 – संत चरण रज –

श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी द्वारा

– प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास, 

 मु. रामनगर वाॅर्ड नं.२०, गडचिरोली.

जि. गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here