तुझ्या वडिलाचे निधन झाले काय?असे म्हटले. यावरून धारदार शस्त्राने केला वार
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
नागपुर :- धारदार शस्त्राने वार करून एका पदपथावरील विक्रेत्याची हत्या करण्यात आल्याची घटना शताब्दी चौकात सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी दोन भावंडांसह तिघांना अटक केली आहे.पवन विजय सोनटक्के (३२) रा. रामटेकेनगर असे मृताचे नाव आहे. राजेश रुपराव प्रधान (३२) आणि त्याचा भाऊ भीमा प्रधान (३५) रा. कौशल्यानगर तसेच विक्की भीमराव गंभीर (३०) रा. कौशल्यानगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पवन हा सीताबर्डीत फुटपाथवर चप्पलचे दुकान लावायचा. आरोपी विक्की पेंटिंगचे काम करतो. तर राजेश आणि भीम ऑटो चालवितात. पवन आणि आरोपी एकाच परिसरात राहात असल्याने त्यांच्यात मैत्री होती. फुटपाथवरील अतिक्रमण हटविल्याने दोन महिन्यांपासून पवन बेरोजगार होता.परंतु, बहुतांश वेळ तो सीताबर्डीतच घालवत होता. राजेश सवारीच्या प्रतीक्षेत होता. डोक्यावर त्याने दुपट्टा घातलेला होता. यावरून पवनने त्याची चिडविण्याच्या उद्देशाने तुझ्या वडिलाचे निधन झाले काय?असे म्हटले. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. नंतर पवन आणि राजेश दोघेही आपआपल्या घरी गेले. परंतु, राजेशने तो शब्द मनाला लावून घेतला. त्यावरून राजेश संतापला होता. तो पवनच्या शोधात होता.
अखेर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास शताब्दी चौकात पवन त्याला भेटला. आता काय म्हणतो सांग. तेव्हा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. आता सांगतो तुला असे म्हणत राजेशने त्याच्याशी वाद घातला. तेव्हा त्याचा भाऊ भीमा आणि मित्र विक्की सोबत होते.
तिघांनीही मिळून पवनवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. पवन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व आरोपी पळून गेले. लोकांची गर्दी झाली.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पवनला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तासाभरात आरोपींना अटक केली