दीड दिवसाच्या बाप्पाला वाजत गाजत निरोप

दीड दिवसाच्या बाप्पाला वाजत गाजत निरोप

25 हजार 551 गणेश मूर्तीचे विसर्जन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात, साश्रुनयनांनी रायगड जिल्ह्यातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. जवळपास 25 हजारांहून अधिक दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. तलाव, समुद्रकिनारे, नद्यांमध्ये विसर्जन सोहळा पार पडला.बुधवारी (दि.27) वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन झाले हाते. जिल्ह्यात एक लाख दोन हजार 484 गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुवारी (दि. 28) दीड दिवसाच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. तलाव, समुद्र, नद्यांमध्ये 25 हजार 551 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत टाळ-मृदुंगासह बेंजोच्या तालावर नाचत विसर्जन ठिकाणापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. बाप्पा आल्यावर जितका आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता, तितकेच दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देतानाचे दुःखही चेहऱ्यावर दिसत होते. बाप्पाच्या विसर्जनावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून सतर्कतेच्या दृष्टीने रायगड पोलिसांकडून सुरक्षेच्या बाबतीत खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यान, अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने समुद्रकिनारी साफसफाई करण्यात येऊन विसर्जनास येणाऱ्या भाविकांच्या मदतीसाठी मदत केंद्र उभारण्यात आले होते.
दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्याची तयारी गुरुवारी दुपारपासून सुरु झाली. सायंकाळी पाचनंतर डोक्यावर गणेशमूर्ती घेत बेंजोच्या वाद्यांबरोबरच भजन करीत नदी, तलावांच्या किनाऱ्यापर्यंत मिरवणूक गावे, वाड्यांमधून काढण्यात आली. विसर्जन स्थळावर पोहोचल्यावर सामूहिक आरती घेण्यात आली. नदी व तलावांमध्ये गणेशमुर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी गावांतील तरुणांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावली. शहरातून सायंकाळी पाचनंतर मिरवणूक काढण्यात आली. अलिबागसह काशीद, वरसोली, मुरूड, रेवदंडा, नागाव, थेरोंडो, किहाम, नागाव, श्रीवर्धन आदी समुद्र किनाऱ्यांवर गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यामध्ये एकूण 25 हजार 551 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 12 व घरगुती 25 हजार 539 गणेशमूर्तीचा समावेश होता. जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करण्यात आला.