*क्रिकेट सट्टेबाजाचा दोन ठिकाणावर छापे, पाच बुकींना अटक*

*प्रशांत जगताप विदर्भ ब्युरो चिप*
नागपूर :- 2020 आयपीएल दुबई येथे सुरु झाल, नागपुर आणी आजुबाजूच्या परीसरात सट्टेबाजीला उत आला आहे. नागपुरमध्ये असाच आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या दोन अड्ड्यावर मानकापूर आणि यशोधरानगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापे घातले. पोलिसांनी या दोन अड्ड्यावरून ५ बुकींना जेरबंद केले. तर त्यांचा एक साथीदार फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आयपीएल सुरू होताच नागपुरातील बुकी आपल्या हस्तकांच्या माध्यमातून जागोजागी क्रिकेट सटट्याची खयवाडी करण्यासाठी अड्डे सुरू करतात. या अड्ड्यावरून लाखो रुपयांची रोज खयवाडी केली जाते. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारच्या क्रिकेट सट्ट्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मानकापूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास एमबी टाऊनमधील गणपती नगरात छापा घातला. येथे मयूर राजकुमार अहिर, निहाल शैलेंद्र जोशी आणि अंकित मुरली माहेश्वरी हे तीन बुकी फोनवरून दिल्ली कॅपिटलविरुद्ध चेन्नई सुपर किंग या क्रिकेट मॅच वर सट्याची खयवाडी करत होते. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एलईडी टीव्ही, चार मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू, सहाय्यक आयुक्त रेखा भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूरचे ठाणेदार गणेश ठाकरे, उपनिरीक्षक कैलास मगर, हवालदार रवींद्र भुजाडे, नायक अंकुश राठोड, अजय पाटील आणि शिपाई रोशन वाडीभस्मे यांनी ही कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे यशोधरानगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री राजीव गांधी नगरातील एका अड्ड्यावर छापा मारला. तेथे अझरुद्दीन जहरुद्दीन काझी आणि आवेश साबीर खान हे दोन बुकी क्रिकेट सट्टा घेताना दिसले. आपल्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडल्याची कुणकूण लागताच त्यांचा तिसरा साथीदार आरोपी सोनू मलिक हा पळून गेला. पोलिसांनी अड्ड्यावरून मोबाईल, टीव्ही तसेच सट्ट्याचे साहित्य जप्त केले. पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमाकांत दुर्गे, उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनीष भोसले, शोएब शेख, राज कुमार पाल आणि प्रसेंजित जांभूळकर यांनी ही कामगिरी बजावली.
*मोठे बुकी, फिक्सरच काय?*
नागपुरात क्रिकेट सट्ट्याची कोट्यवधी रुपयांची खयवाडी करणारे अनेक मोठे बुकी, फिक्सर आहेत. त्यातील काहींनी आपले बस्तान नागपूर शहराच्या सीमेवर मौदा, भंडारा जिल्ह्यात आणि बुटीबोरीकडे वर्धा जिल्ह्यात बसविले आहे. या ठिकाणाहून ते आपल्या साथीदाराच्या माध्यमातून रोज कोट्यवधीची खायवाडी करून घेत आहेत. त्यांचे काही दलाल त्यांना पोलिसांच्या कारवाईपासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सेटिंगबाज बड्या बुकीवर कारवाई होताना दिसत नाही. पोलीस छुटपूट बुकींवर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here